अतिक्रमण वाचविण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:45+5:302021-01-15T04:08:45+5:30
राजकीय दबाव असल्याची चर्चा : नागरिकांतून संतापाची लाट श्याम नाडेकर नरखेड : नरखेड-घुबडमेट-झिल्पा- पारशिवनी या राज्यमार्ग क्रमांक ३५५ चे ...
राजकीय दबाव असल्याची चर्चा : नागरिकांतून संतापाची लाट
श्याम नाडेकर
नरखेड : नरखेड-घुबडमेट-झिल्पा- पारशिवनी या राज्यमार्ग क्रमांक ३५५ चे बांधकाम सुरू आहे. २२ ते २४ मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण वाचविण्याकरिता राजकीय दबाव आणून रस्त्याची रुंदी कमी करण्यात आल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. राज्य महामार्ग क्रमांक ३५५ च्या घुबडमेट-नरखेड या ३४ किलोमीटरचे काम राज्य सरकारच्या हायब्रीड ॲन्युटी मॉडेल पॅकेज नं. एनएजी १२६ या योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ नागपूरमार्फत सुरू आहे. सदर कामाची किंमत ८४.८४ कोटी रुपये आहे. या कामाकरिता मे. पाटणसावंगी हिंगणा रोडवेज प्रा.लि.ला १ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. सदर राज्यमार्ग नरखेड नगर परिषद हद्दीतून जातो. नगर परिषद हद्दीतील रस्त्याची लांबी ४०० मीटर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभिलेखाप्रमाणे रस्त्याची रुंदी २२ ते २४ मीटर आहे. रस्त्याच्या मध्य भागापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ९ मीटर सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम आहे. सदर ४०० मी. लांबीच्या रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण आहे. त्या सर्व अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याच्या नोटिसीही दिल्या. काही अतिक्रमणधारकांनी त्यांचे अतिक्रमण काढले. राजकीय पक्षाशी जवळीक असलेल्या एका व्यावसायिकाच्या इमारतीतील दुकानाचे गाळे व काही राजकीय व्यक्तींचे प्लॉट, घर व दुकाने या अतिक्रमणात येत असल्याने त्यांनी एका राजकीय नेत्याकडे धाव घेत या रस्त्याची रुंदी कमी करून घेतली. त्यामुळे २२-२४ मीटरचा असलेला रस्ता केवळ १८ मीटर बनविण्यात आला. रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होईल. अनेक अडचणी येतील म्हणून नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत काँग्रेस, शिवसेना, पिरिपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
नरखेड नगर परिषद हद्दीतील ४०० मीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. रस्ता बनविण्याच्या सहाव्या-सातव्या दिवशीच रस्त्याला अनेक जागी भेगा पडल्या. सिमेंट काँक्रीटच्या कामावर पाणी मारणे गरजेचे असताना पाणी मारण्यात आले नाही. नियमाप्रमाणे सूर्यास्तापूर्वी व सूर्यास्तानंतर काम करण्यास मनाई असूनही रात्री काँक्रीटचे काम करण्यात आले.
-
नागरिकांच्या गैरसमजातून रस्त्याची रुंदी कमी केल्याचे बोलले जात आहे. नगर परिषद विकास आराखड्यानुसार नगर परिषद हद्दीमधून जाणाऱ्या ४०० मीटर रस्त्याची रुंदी १८ ते २२ मीटरदरम्यान आहे. त्या कारणास्तव रस्त्याची रुंदी कमी आहे. कोणाच्या हिताकरिता किंवा दबावात रुंदी कमी करण्यात आली नाही.
अभिजित कुचेवार, सहायक अभियंता श्रेणी-१, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (ग्रामीण)