मनपाचा १.६० कोटींचा खर्च वाचला
By admin | Published: October 17, 2016 02:50 AM2016-10-17T02:50:45+5:302016-10-17T02:50:45+5:30
नागपूर महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीव्दारे करण्यात दोन वर्षानंतर यश आले आहे.
शालार्थ प्रणालीमुळे दिलासा : शिक्षकांचे आॅनलाईन वेतन
नागपूर : नागपूर महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीव्दारे करण्यात दोन वर्षानंतर यश आले आहे. यामुळे दर महिन्याला वेतनावर करावा लागणारा १ कोटी ६० लाखांचा खर्च वाचणार असल्याने महापालिकेला बिकट आर्थिक परिस्थितीत थोडा दिलासा मिळाला आहे.
दर महिन्याला शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु शालार्थ प्रणालीमुळे सप्टेंबर महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्याचे वेतनही दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या खात्यात जमा होणार असल्याने शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे.
या निर्णयाचा लाभ २५८ शिक्षक व ६३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शालार्थ प्रणाली लागू न केल्याने माध्यमिक शिक्षकांचे वेतन महापालिकेला करावे लागत होते. त्यामुळे एप्रिल २०१५ पासून या शिक्षकांच्या वेतनावर ३० कोटी ४० लाखांचा खर्च करावा लागला आहे.
राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन एप्रिल २०१४ पासून आॅनलाईन झाले आहे. परंतु महापालिके च्या शाळांचे वेतन आॅनलाईन न झाल्याने वेतनचा भुर्दड महापालिकेवर पडत होता.(प्रतिनिधी)
३० कोटी लवकरच मिळतील
महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे वेतन आॅनलाईन व्हावे. यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. शिक्षण समितीच्या प्रत्येक बैठकीत याचा आढावा घेण्यात येत होता. अखेय या प्रयत्नांना यश मिळाले. या निर्णयामुळे शिक्षकांना दर महिन्याला वेळेवर वेतन मिळेल. महापालिकेच्या खर्चात बचत होईल. महापालिकेते खर्च केलेला ३० कोटी ४० लाखांचा निधी शासनाकडून लवकरच मिळेल.
-गोपाल बोहरे,शिक्षण सभापती