उपराजधानीत १५० टँकर कमी केल्याने ९.५० कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 08:15 PM2020-05-17T20:15:27+5:302020-05-17T20:16:59+5:30

गेल्या वर्षी नागपूर महापालिकेला ४५१ टँकरवर २७ कोटींचा खर्च करावा लागला. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या वर्षासारखी पाणीटंचाई नसल्याने १५० टँकर कमी करण्यात आले. यामुळे ९ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे.

Save Rs 9.50 crore by reducing 150 tankers in Nagpur | उपराजधानीत १५० टँकर कमी केल्याने ९.५० कोटींची बचत

उपराजधानीत १५० टँकर कमी केल्याने ९.५० कोटींची बचत

Next
ठळक मुद्देवर्षाला टँकरवर २७ कोटीचा खर्चपावसाळ्यात टँकरची मागणी पुन्हा कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्ष २०१८ मध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात नागपूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. शहरात पाणी पुरवठ्याचे नेटवर्क असलेल्या भागात १०५ तर नॉन नेटवर्क म्हणजेच शहरालगतच्या भागात ३४६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागला. ४५१ टँकरवर गेल्या वर्षी महापालिकेला २७ कोटींचा खर्च करावा लागला. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या वर्षासारखी पाणीटंचाई नसल्याने १५० टँकर कमी करण्यात आले. यामुळे ९ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे.

नॉन नेटवर्क भागात ३५४ टँकर सुरू होते. यातील १२० टँकर बंद करण्यात आले असून सध्या २२६ टँकर सुरू आहेत. तर नेटवर्क भागात १०५ टँकर सुरू होते. यातील ३० टँकर बंद करण्यात आले असून सध्या ७० टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने व अधूनमधून अवकाळी पाऊस येत असल्याने विहिरींना अजूनही पाणी आहे. त्यामुळे दरवर्षी सारखी या उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही. याचा विचार करता टँकर कमी करण्यात आले आहेत.
नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळयात पाणीटंचाई जाणवणार नाही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी अचानक वाढते. गेल्या वर्षी जलसाठा संपल्याने मृत साठ्यातील पाण्यांचा वापर करावा लागला होता. मनपाला यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागली होती. त्यानंतर हा पाणीसाठा वापरता आला होता.

पावसाळ्यात पुन्हा ७० ते ८० टँकर कमी करणार

टँकरवर मनपाला वर्षाला २७ कोटींचा खर्च करावा लागत होता. १५० टँकर कमी केल्याने यात ९ ते १० कोटींची बचत होणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा वापर कमी होतो. याचा विचार करता या कालावधीत पुन्हा ७० ते ८० टँकर कमी करण्याचा विचार आहे. याबाबतचा आढावा घेवून निर्णय घेतला जाईल.यामुळे टँकरवर होणारा खर्च २७ कोटीवर १२ ते १३ कोटींवर येईल. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली.

तोतलाडोह प्रकल्पात ७९.६४ टक्के जलसाठा
तोतलाडोह प्रकल्पात सध्या ७९.६४ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाची क्षमता १०१६,८८दलघमी आहे. आजच्या तारखेला या प्रकल्पात ८०८ दलघमी जलसाठा आहे. यामुळे नागपूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. लॉकडाऊनमुळे मोठे हॉटेल्स, रेस्टारंट, सर्व्हीसिंग सेंटर, मंगल कार्यालये, लॉन बंद असल्याने पाण्याचा वापर वाढलेला नाही. बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. परंतु बांधकाम बंद असल्याने पाण्याचा वापर कमी आहे. याचा मागणीवर परिणाम झाला आहे.

 

Web Title: Save Rs 9.50 crore by reducing 150 tankers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी