विहिरीत पडलेल्या दाेन नीलगाईंना जीवदान; बचाव पथकाच्या मदतीने काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 09:49 PM2022-02-08T21:49:25+5:302022-02-08T21:49:57+5:30
Nagpur News वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील बाेपापूर व खैरी शिवारातील विहिरीत एकाच दिवशी प्रत्येकी एक अशा दाेन नीलगाई (राेही) पडल्या. वन विभागाच्या पथकाने त्या दाेन्ही नीलगाईंना विहिरीतून बाहेर काढले व जंगलात साेडले.
नागपूर : वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील बाेपापूर व खैरी शिवारातील विहिरीत एकाच दिवशी प्रत्येकी एक अशा दाेन नीलगाई (राेही) पडल्या. विशेष म्हणजे त्या दाेन्ही विहिरी काेरड्या आहेत. वन विभागाच्या पथकाने त्या दाेन्ही नीलगाईंना विहिरीतून बाहेर काढले व जंगलात साेडले. ही घटना मंगळवारी (दि. ८) सकाळी घडली.
काेंढाळी (ता. काटाेल) वनपरिक्षेत्रांतर्गत येणारा बाेपापूर व खैरी परिसर जंगलव्याप्त असून, त्या जंगलात विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य व वावर आहे. दाेन नीलगाई खाद्य व पाण्याच्या शेतात वाट चुकल्या आणि बाेपापूर व खैरी शिवारात आल्या. एक नीलगाय निखिल विश्वनाथ धारपुरे यांच्या मासोद - कामठी मार्गालगतच्या बाेपापूर शिवारातील शेतात असलेल्या विहिरीत पडली, तर दुसरी नीलगाय पराडकर यांच्या कोंढाळी - वर्धा मार्गालगतच्या खैरी शिवारातील शेतात असलेल्या विहिरीत पडली.
या दाेन्ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडल्या. माहिती मिळताच कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कगपते यांनी वन विभागाचे कर्मचारी व वनमजुरांना दाेन्ही ठिकाणी पाठविले. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने दाेन्ही नीलगाईंना दाेरांनी बांधून विहिरींमधून बाहेर काढले. त्यांना फारसी दुखापत झाली नसल्याचे आढळून आल्याने त्या दाेन्ही नीलगाईंना जवळच्या जंगलात साेडण्यात आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कगपते यांनी दिली.