‘ऑपरेशन बालासोर’मधून ‘त्यांनी’ वाचविले शेकडो प्राण; अडीच हजार कर्मचारी अन् शेकडो देवदूत
By नरेश डोंगरे | Published: June 9, 2023 06:10 AM2023-06-09T06:10:33+5:302023-06-09T06:11:08+5:30
महाराष्ट्राचे सुपुत्र जिल्हाधिकारी दत्तात्रेय शिंदे यांची कामगिरी
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एकीकडे मृतदेहांचा खच, त्यात पावलोपावली दबलेले वेदनांनी विव्हळणारे गंभीर जखमी, मृतांच्या नातेवाइकांच्या किंकाळ्या, आक्रोश अन् वेदनांचा तो क्षण कुणाच्याही काळजाचे पाणी करणारा होता. मीसुद्धा त्या क्षणी सुन्न झालो होतो. मात्र, कर्तव्य भावनेने दुसऱ्याच क्षणी भानावर आलो. ॲम्बुलन्स, बंब, डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, पोलिसांच्या तत्परतेने सुरू झाले ‘ऑपरेशन बालासोर’. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविल्याची भावना व्यक्त केली महाराष्ट्राचे दत्तात्रेय भाऊसाहेब शिंदे यांनी !
महाराष्ट्राच्या पारनेर तालुक्यातील मूळ निवासी असलेले दत्तात्रेय ऊर्फ दत्ता शिंदे बालासोरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दि. २ जूनच्या रात्री बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला अन् त्यात २७८ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडोजण गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी पोहोचताच जिल्हाधिकारी शिंदे यांनी जलदगतीने निर्णय घेतले, भरीव मदतकार्यही राबविले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने आज त्यांच्याशी संपर्क साधून ‘ऑपरेशन बालासोर’ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, घटनास्थळी खूप अंधार असल्याने ५० टॉवर लाइट्सची व्यवस्था करून जखमींना रुग्णालयात हलविणे सुरू केले. सुमारे एक हजार ते बाराशे व्यक्तींना आजूबाजूच्या शहरातील विविध इस्पितळात पाठविले.
अडीच हजार कर्मचारी अन् शेकडो देवदूत
‘लोकमत’शी बोलताना शिंदे यांनी देवदूतांची गोष्ट सांगितली. गेल्या सहा दिवसांपासून आम्ही सुमारे अडीच हजार अधिकारी-कर्मचारी काम करीत आहोत. मात्र, अपघात झाल्यापासूनच शेकडो देवदूत येथे अपघातग्रस्तांंच्या मदतीसाठी तहान-भूक विसरून मदतकार्य करीत आहेत. कोणतीही अपेक्षा न करता स्वयंस्फूर्तीने या देवदूतांनी मदत कार्यात दिलेले योगदान अतुलनीय असल्याचेही ते म्हणाले.
आता ‘त्यांना’ सर्वोच्च प्राधान्य : जखमींवर तातडीचे उपचार ही आतापर्यंतचे प्राधान्य होते. आता मात्र अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रमाणपत्राशिवाय विम्याची रक्कम आणि अन्य सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी वेगवेगळे पथके नियुक्त केली आहेत, असे जिल्हाधिकारी दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितले.