मृत्यूच्या दारातील बाळंतिणीचा वाचविला जीव; मेडिकलच्या ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’ला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2023 08:00 AM2023-02-12T08:00:00+5:302023-02-12T08:00:01+5:30
Nagpur News मृत्यूच्या दारात असलेल्या एका बाळंतिणीला नागपुरातील मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या चमूने प्रयत्नांची शर्थ करून वाचवण्यात यश मिळवले.
सुमेध वाघमारे
नागपूर : भंडाऱ्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात २० वर्षीय महिलेची प्रसूतीनंतर गर्भाशयाची स्थिती बदलली, अतिरक्तस्राव होऊ लागला, दोनदा हृदयही बंद पडले, जिल्हा शल्यचिकित्सकांपासून ते डॉक्टरांच्या चमूने शर्थीचे प्रयत्न सुरू केले, नागपूर मेडिकलचा ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’शी संवाद साधला जात होता, गुंतागुंत वाढत असल्याचे पाहत, तिला नागपूर मेडिकलमध्ये दाखल केले, दारावरच ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’ उभी होती, तातडीने उपचाराला सुरुवात झाली आणि त्या मातेचा जीव वाचविला.
भंडाऱ्यातील खुर्दा येथील रहिवासी असलेली संगीता (बदलेले नाव) त्या महिलेचे नाव. तिची पहिलीच प्रसूती. नातेवाइकांनी तिला भंडाऱ्यातील कोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. २७ जानेवारीला तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु प्रसूतीनंतर तिच्या गर्भाशयाची स्थिती बदलली. याला वैद्यकीय भाषेत ‘इनर्व्हशन युट्रस’ म्हणतात. यातच अतिरक्तस्राव होऊ लागल्याने, सायंकाळी ७.३० वाजता भंडारा जिल्हा रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले. येथे उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचे हृदय बंद पडले. भंडाऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दीपक सयाम, रुग्णालयाचा स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या डॉ.नीलम जांभूळकर, जनरल सर्जन डॉ.अरुण नडंगे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ.भारती मालवे यांनी तिला ‘इन्ट्युबेट’ करून ‘सीपीआर’ दिला, यामुळे हृदयाचे कार्य पुन्हा सुरू झाले. तिला व्हेंटिलेटरवर घेतले आणि रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. डॉ.सयाम आणि त्यांची टीम नागपूर मेडिकलच्या ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’च्या संपर्कात होते. रात्रभर उपचार सुरू होते. काही प्रमाणात यश येत असताना रुग्णाची प्रकृती खालावली जात होती. यामुळे २८ जानेवारी रोजी सकाळी तिला नागपूर मेडिकलमध्ये हलविण्यात आले. दारावरच मेडिकलची ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’ सज्ज होती. तातडीने शस्त्रक्रिया गृहात दाखल करून, ‘बलून’ उपचार पद्धतीने तिचा रक्तस्राव थांबविण्यात आला. यात शस्त्रक्रियेची गरज पडली नाही. तिला १६ रक्त पिशव्या व १० पिशव्या प्लेटलेट्स देण्यात आल्या. दोन दिवसांनंतर ती व्हेंटिलेटरमधून बाहेर आली, परंतु किडनी विकार उद्भवल्यामुळे तीन डायलेसिस देण्यात आले. भंडारा व नागपूरच्या डॉक्टरांच्या सामूहिक प्रयत्नाने ती धोक्याबाहेर आली. लवकरच तिला पुढील दोन-तीन दिवसांत सुट्टीही मिळणार आहे.
- सामूहिक प्रयत्नामुळे वाचला जीव
मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे डॉ.आशिष झरारीया यांनी ‘लोकमत’ला सांगितले, भंडारा व मेडिकलच्या ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’च्या सामूहिक प्रयत्नामुळे या २० वर्षीय महिलेचा जीव वाचविणे शक्य झाले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये, स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ.मंजुश्री वाईकर यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’ला अशा अनेक प्रकरणात यश मिळत आहे.