नागपुरात सावित्रीच्या लेकींचा मेट्रो प्रवास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:16 PM2019-05-06T23:16:31+5:302019-05-06T23:17:31+5:30
रविवारची सकाळ नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर विद्यार्थिनींच्या उत्साही-आनंदी आवाजाचा गलका सुरू होता. प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याची त्यांची जिज्ञासा शिगेला पोहोचली होती. त्यांचा आनंद पाहून मेट्रो स्टेशनवरही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोण होत्या या विद्यार्थिनी? मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मेळघाट या दुर्गम भागातील आदिवासी मुलींच्या शाळेतील १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थिनी पहिल्यांदा शहर पाहायला नागपुरात आल्या होत्या. सहा दिवसाच्या वास्तव्यानंतर शेवटच्या दिवशी धावत्या मेट्रोमधून शहर पाहायला त्या मेट्रो प्रवासासाठी स्टेशनवर दाखल झाल्या होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच स्टेशनसारखी उंच अद्ययावत इमारत आणि तेथील सोयी बघून थक्क होऊन अचंबित विस्मयकारक होऊन त्यांचा किलबिलाट आसमंत व्यापून टाकत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारची सकाळ नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर विद्यार्थिनींच्या उत्साही-आनंदी आवाजाचा गलका सुरू होता. प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याची त्यांची जिज्ञासा शिगेला पोहोचली होती. त्यांचा आनंद पाहून मेट्रो स्टेशनवरही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोण होत्या या विद्यार्थिनी? मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मेळघाट या दुर्गम भागातील आदिवासी मुलींच्या शाळेतील १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थिनी पहिल्यांदा शहर पाहायला नागपुरात आल्या होत्या. सहा दिवसाच्या वास्तव्यानंतर शेवटच्या दिवशी धावत्या मेट्रोमधून शहर पाहायला त्या मेट्रो प्रवासासाठी स्टेशनवर दाखल झाल्या होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच स्टेशनसारखी उंच अद्ययावत इमारत आणि तेथील सोयी बघून थक्क होऊन अचंबित विस्मयकारक होऊन त्यांचा किलबिलाट आसमंत व्यापून टाकत होता.
रविवारला विदर्भ वनवासी कल्याण आश्रम, मेळघाट येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या एका गटाने नागपूर मेट्रोमधून प्रवास केला. नागपूर मेट्रोने प्रवास करताना पुलावरून जाणाऱ्या धावत्या गाडीतून दिसणारे शहराचे सौंदर्य न्याहाळताना या मुली तल्लीन झाल्या होत्या. शहरापासून सर्वच दृष्टीने दूर असलेल्या मेळघाटसारख्या दुर्गम भागात अभावातील जीवन जगणाऱ्या या विद्यार्थिनींसाठी चकचकीत शहर, पक्के रस्ते, उंच इमारती, सुसाट धावत्या गाड्या हे सगळंच नवलाईचं होतं. पण बाहेर ४५ डिग्री तापलेले असताना धावणाऱ्या मेट्रोच्या आत थंड वाऱ्यात प्रवास करायला मिळतोय, हा त्यांचा मुख्य आश्चर्याचा विषय होता. १३ वर्षांच्या पूनम पाटणकर हिने पुलावरून जाणाऱ्या मेट्रोत बसणे म्हणजे विमानात बसल्यासारखे वाटत होते. तर १६ वर्षांच्या रश्मी पात्रे या विद्यार्थिनीला आपल्या आई-बाबांनी कधीही न पाहिलेल्या न ऐकलेल्या मेट्रोमध्ये आपण बसलो हे त्यांना जाऊन सांगायची उत्सुकता दाटून आली होती.
नागपूर मेट्रोच्या खापरी स्थानकावरून हा प्रवास सुरू झाला तो सीताबर्डीपर्यंत चालला. यादरम्यान या विद्यार्थिनींनी दोन्ही बाजूच्या खिडकीमधून देखावे टिपले. खापरी, न्यू एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट, एअरपोर्ट आणि सीताबर्डी या स्थानकांना भेट देऊन विस्मयकारक वाटणाऱ्या इमारती, मूर्ती, चित्रे असे सगळे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत परतीच्या प्रवासाला निघाल्या. प्रवासादरम्यान नागपूर मेट्रोत प्रवास केल्याचा आनंद त्यांच्या गप्पांमधून आणि डोळ्यातूनही ओसंडून वाहत होता. नागपूर मेट्रो ही माझी मेट्रो म्हणजेच सर्वांची मेट्रो असल्याचेच हे द्योतक आहे. या प्रवासासाठी विदर्भ वनवासी कल्याण आश्रमने पुढाकार घेतला होता. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर मंडळी यावेळी सोबत होते.