सावजी हॉटेल्स की बीयरबार?
By admin | Published: May 26, 2017 02:49 AM2017-05-26T02:49:16+5:302017-05-26T02:49:16+5:30
नागपुरातील सर्वच सावजी हॉटेल्स आणि लॉनमध्ये दारूची सर्रास विक्री आणि मालक पिण्यास परवानगी देत असल्याच्या प्राप्त माहितीवरून
फार्महाऊस किचन सावजी हॉटेलवर धाड : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील सर्वच सावजी हॉटेल्स आणि लॉनमध्ये दारूची सर्रास विक्री आणि मालक पिण्यास परवानगी देत असल्याच्या प्राप्त माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री बजाजनगर येथील फार्महाऊस किचन सावजीवर धाड टाकली. कारवाईदरम्यान हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली.
बजाजनगर भागात अनेक सावजी हॉटेल्स आणि लॉन्स आहेत. सर्व ठिकाणी हॉटेलचे मालक ग्राहकांना दारू पिण्यास परवानगी देतात आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. या भागातील लोकांना दारूड्यांचा त्रास होतो.
यासंदर्भात लोकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केल्याची माहिती आहे. विभागाने मोहीम राबवून फार्महाऊस किचन सावजी हॉटेलसह या भागातील अन्य
हॉटेलवरसुद्धा कारवाई केली. अधिकाऱ्यांनी हॉटेलमालकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
महामार्गांवर होणारे अपघात लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्य व राष्ट्रीय महामार्ग आणि या महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील बार व परमिट रूममधील दारूविक्रीवर प्रतिबंध लावले आहेत. आदेशाची
अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यानंतरही या हॉटेलमध्ये दारूविक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याआधारे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलवर धाड टाकली. विभागातर्फे ही मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.