सावनेरचा रेल्वे अंडरब्रिज पाण्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:08 AM2021-07-30T04:08:53+5:302021-07-30T04:08:53+5:30
सावनेर : वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी सावनेरच्या रेल्वेस्थानक परिसरात नागपूर - सावनेर - छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे लाईनखाली अंडर ...
सावनेर : वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी सावनेरच्या रेल्वेस्थानक परिसरात नागपूर - सावनेर - छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे लाईनखाली अंडर ब्रिज बनविण्यात आला आहे. मात्र, पावसाळा आला की, या ब्रिजखाली पाणी साचते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली. अद्याप याची दखल घेण्यात आली नाही.
सावनेर येथील वार्ड क्रमांक १२ आणि परिसरातील नागरिकांना रहदारीच्या सोयीसाठी स्थानकालगत अंडरब्रिजची निर्मिती करण्यात आली. या पुलाखालून नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने किंबहुना अनेकदा रेल्वेची पाईपलाईन फुटल्यानेसुद्धा येथे पाणी साचते. यासंदर्भात नगर परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. अरविंद लोधी यांनी नागरिकांच्या समस्यांची दखल घेत रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. परंतु त्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखविली. ब्रॉडगेज रेल्वेचे काम सुरू असताना हा पूल बनविण्यात आला नव्हता. नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, पुलाखाली रहदारीयोग्य कोणतीही सुविधा नसल्याने यासाठी पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.