सावनेरचे क्रीडा संकुल कचऱ्याच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:07+5:302021-05-28T04:08:07+5:30
बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शहराच्या मध्यभागी अर्थात सुभाष प्राथमिक शाळा व म्युनिसिपल हायस्कूलच्या मध्ये असलेल्या क्रीडांगणावर ...
बाबा टेकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहराच्या मध्यभागी अर्थात सुभाष प्राथमिक शाळा व म्युनिसिपल हायस्कूलच्या मध्ये असलेल्या क्रीडांगणावर राज्य शासनाने क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेत निधी उपलब्ध करून दिला. त्यातून क्रीडा संकुलही उभारण्यात आले. मात्र, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या उदासीन धाेरणामुळे हे क्रीडा संकुल घाण, कचरा व गाजर गवताच्या विळख्यात सापडले आहे. प्रशासन व लाेकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या क्रीडा संकुलातील ४०० मीटर धावपट्टीचेही स्वप्न अधांतरीच आहे.
पूर्वी या मैदानावर फुटबाॅल, कबड्डी, क्रिकेट यांसह अन्य खेळाडू राेज खेळताना दिसायचे. या मैदानाचे क्रीडा संंकुलात रूपांतर झाल्यानंतर हे चित्र दिसेनासे झाले. स्थानिक नगर परिषद प्रशासनाने या मैदानाचा अर्धा भाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला क्रीडा संकुलासाठी दिल्याने स्थानिकांच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. त्यांना या संकुलात ४०० मीटरची धावपट्टी हवी असल्याने तशी मागणीही करण्यात आली. मात्र, प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नाही.
सारासार विचार न करता या संकुलात स्केटिंग काेर्ट व मिनी स्टेडियम तयार करण्यात आले. या दाेहाेंचा फारसा उपयाेग हाेत नसल्याने तिथे आता झुडपी जंगल तयार झाले आहे. संकुलाची इमारत संपूर्ण जागेवर उभारण्यात आल्याने या मैदानावर आता बॅडमिंटनशिवाय काेणताही खेळ व्यवस्थित खेळता येत नाही. या संकुलाच्या बाजूला तयार केलेल्या दाेन दोन रूमच्या जागेवर संकुलाची निर्मिती केली असती तर येथे बॉक्सिंग, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, तायक्वांदो, कराटे असे विविध खेळ एकाच ठिकाणी खेळणे शक्य झाले असते. या संकुलाकडे राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने नवल व्यक्त केले जात आहे.
...
कचरा व घाणीमुळे दुर्गंधी
या क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ माेठ्या प्रमाणात कचरा व घाण साचली आहे. मार्केटमधील व्यापारी व दुकानदार याच ठिकाणी कचरा टाकत असून, त्याची वेळीच विल्हेवाट लावली जात नसल्याने ताे सडला आहे. येथे अनुकूल जागा मिळाल्याने माेकाट गुरे, कुत्री व डुकरांचाही वावर वाढला आहे. काही महाभाग याच ठिकाणी लघुशंका व इतर नैसर्गिक विधी आटाेपतात. त्यामुळे या परिसरात उग्र वास येत असल्याने नाकावर रुमाल ठेवून आत प्रवेश करावा लागताे.
...
ग्रीन जिम अंधारात
याच मैदानावर स्केटिंग कोर्टच्या बाजूला ग्रीन जिम तयार केला असून, परिसरात तसेच व्हाॅलीबाॅल मैदानाजवळ गाजर गवत वाढले आहे. ते गवत मुले व इतरांच्या आराेग्यास हानिकारक ठरत आहे. या परिसरात विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात न असल्याने संपूर्ण परिसर अंधारात असताे. वाकलेले पाेल व अंधार यामुळे येथे व्हाॅलीबाॅल खेळणेही शक्य हाेत नाही. गवत व झुडपांमुळे या मैदानावर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे.