धापेवाडाच्या 'त्या' डान्स बारवर छापा; चौघांना अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 10:49 AM2021-10-26T10:49:15+5:302021-10-26T11:00:31+5:30
सावनेर पोलिसांनी कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील डान्सबारवर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी पाच बारबालाही आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करताना आढळून आल्या.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील शिवम बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या डान्स बारवर सावनेर पाेलिसांच्या पथकाने रविवारी (दि. २४) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास छापा टाकला. यात चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण एक लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये रेस्टाॅरंटचा व्यवस्थापक मनीष ऊर्फ विक्की प्रेम नारायण जयस्वाल (वय ३२, रा. फ्रेंड्स कॉलनी, नागपूर), वेटर राहुल विकास रामटेके (३०, रा. सालाई खुर्द, ता. मोहाडी, जिल्हा भंडारा), टीकेंद्र वधाराव सावजी (३२) व रोहितकुमार सुरेश शाहू (२८, दाेघेही रा. रामकुंड, जिल्हा चक्का, झारखंड) यांचा समावेश आहे. यातील तिघे धापेवाडा येथे भाड्याच्या घरात राहायचे. रेस्टॉरंटचा मालक मात्र पाेलिसांना गवसला नाही.
रविवारी रात्री धापेवाडा येथील शिवम बार ॲण्ड रेस्टॉरंटकडे जाणाऱ्या आंबटशाैकिनांची संख्या वाढल्याने गावातील काहींना संशय आला. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती पाेलिसांना दिली. त्यामुळे सावनेर पाेलिसांच्या विशेष पथकाने लगेच बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. आत डान्स बार सुरू असल्याचे कळताच पथकाने छापा टाकला.
रेस्टाॅरंटच्या हाॅलमध्ये संगीताच्या तालावर काही बारबाला डान्स व बिभत्स अंगविक्षेप करीत असल्याने निदर्शनास आले. त्यामुळे पाेलिसांनी लगेच सर्वांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये ९,५०० रुपये राेख, सहा हजार रुपयांचे ढोलक, चार हजार रुपयांचे टीमबाली, ८५ हजार कीबाेर्ड, चार हजार रुपयांचा कॅशिना, सहा हजार रुपयांचे माईक आणि स्पीकर असा एकूण एक लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि २९४, ११४, ३४, महाराष्ट्र हाॅटेल उपाहारगृहे व मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबतचा अधिनियम २०१६ चे कलम १२, सहकलम ३, ४, ८, (१), (२) (४) अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पाेलीस निरीक्षक मारुती मुळूक, सहायक पाेलीस निरीक्षक शिवाजी नागवे, उपनिरीक्षक गेडाम यांच्या पथकाने केली.
पाच बारबाला पाेलिसांच्या ताब्यात
या कारवाईमध्ये पाेलिसांनी पाच बारबालांसह ऑर्केस्ट्रा स्टेजवरील पुरुष कलाकार पराग दीपक साळसकर (४०, रा. योगीनगर, सन फ्लॉवर हाईट, अमरेली, गुजरात), मासून अब्बास मोहम्मद (५३, रा. अब्बासी हाऊस, पाईसार रोड, कांदिवली वेस्ट, मुंबई), प्रवीण नारायण मोरे (५१, रा. टॅगाेर नगर, विक्राेळी, मुंबई ईस्ट), शेख नसीर वल्द नफिज अहमद (५०, रा. खालीद खजुरी सोसायटी, मालवणी, मालाड, मुंबई वेस्ट) यांना ताब्यात घेण्यात आले असून, हे सर्वजण धापेवाडा येथे भाड्याने राहायचे. त्यांना सूचनापत्र देऊन साेडून देण्यात आले.