म्हणे! ५०३८ खड्डे बुजवले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 12:56 AM2020-09-09T00:56:41+5:302020-09-09T00:58:05+5:30
खड्डे पडतात, ते बुजविलेही जातात. तरी रस्त्यावर खड्डे राहतातच. शहरात असलेल्या एकूण खड्ड्यांपैकी ५०३८ खड्डे बुजविल्याचा दावा मनपाने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खड्डे पडतात, ते बुजविलेही जातात. तरी रस्त्यावर खड्डे राहतातच. शहरात असलेल्या एकूण खड्ड्यांपैकी ५०३८ खड्डे बुजविल्याचा दावा मनपाने केला आहे. असे असतानाही जीवघेण्या खड्ड्यांची संख्या कमी का झाली नसावी असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. पावसामुळे तर त्यात खोलवर खड्ड्यांची भर पडली आहे. गिट्टी, डांबरही वाहून गेले आहे.
नागरिकांच्या तक्रारी आणि नियमित कामांतर्गत १ जानेवारी ते ३०ऑगस्ट या आठ महिन्याच्या काळात शहरातील ५०३८ खड्डे बुजवले आहेत. सुमारे ९४२४० वर्गफूट परिसर या माध्यमातून समतल करण्यात आला. हॉट मिक्स प्लँट विभाग, जेट पॅचर मशीन आणि इन्स्टा रोड पॅचर मशीनद्वारे हे खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. महापौर संदीप जोशी यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मंगळवारी ही माहिती विभागामार्फत देण्यात आली. शहरात खड्ड्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. हॉट मिक्स प्लँट यांनी तात्काळ खड्डे बुजवण्याची कारवाई करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.
हॉट मिक्स प्लँटच्या माध्यमातून ८२५२२.८२ वर्गमीटर क्षेत्र असलेले ३८७६ खड्डे बुजवण्यात आले. जेट पॅचरच्या माध्यमातून ४३२४.८२ वर्ग मीटर क्षेत्रातील ३१२ खड्डे तर इन्स्टा रोड पॅचरच्या माध्यमातून ७३९४.५७ वर्गमीटर क्षेत्र असलेले ८५० खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. बैठकीत कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, मेकॅनिकल इंजिनियर योगेश लुंगे, उप अभियंता कमलेश चव्हाण उपस्थित होते.
झोननिहाय बुजवलेले खड्डे
लक्ष्मीनगर - ५२३
धरमपेठ - ३८५
हनुमाननगर - ३८०
धंतोली - २४८
नेहरूनगर - ६८०
गांधीबाग - ३३४
सतरंजीपुरा - १३६
लकडगंज - २३१
आशीनगर- ३८४
मंगळवारी - ५७५
एकूण - ३८७६ खड्डे