से नो टू ‘नायलॉन’ मांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:56 AM2019-01-14T11:56:57+5:302019-01-14T11:59:07+5:30

‘नायलॉन’ मांजाने पतंग उडवून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्या पतंगबाजांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यानंतरच त्यांच्यावर वचक येईल.

say No To 'Nylon' Manza | से नो टू ‘नायलॉन’ मांजा

से नो टू ‘नायलॉन’ मांजा

Next
ठळक मुद्देजनमानसाची प्रतिक्रिया कारवाईमुळेच पतंगबाजांवर वचक येईल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नायलॉन’ मांजाने पतंग उडवून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्या पतंगबाजांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यानंतरच त्यांच्यावर वचक येईल. त्याकरिता प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी कारवाई करण्याची हिंमत दाखविण्याची वेळ आली आहे अशी मागणी जनतेद्वारे करण्यात येत आहे.
संक्रांतीच्या काळात ‘नायलॉन’ मांज्यामुळे जीव गेल्याच्या घटना नागपुरात घडल्या आहेत. शिवाय दरवर्षी अनेक लोक, प्राणी, पक्षी या मांज्यामुळे जखमी होतात.‘नायलॉन’च्या मांजाने पतंग उडवल्यामुळे धोका आहे हे माहिती असूनदेखील नागरिक तोच मांजा विकत घेतात.
या मांज्याच्या विक्रीवर व वापरण्यावर बंदी आहे. मात्र असे असतानादेखील शहरात या मांज्याची विक्री व उपयोग सर्रासपणे सुरू आहे. विक्रेत्यांनी आपल्या विक्रीचा ‘पॅटर्न’ बदलला आहे, मात्र मांजा सहजपणे उपलब्ध आहे. जुनी शुक्रवारी, इतवारी, सक्करदरा, उत्तर नागपूर, धरमपेठ, गोपालनगर यासारख्या काही भागात ‘नायलॉन’ मांज्याची विक्री सुरू आहे. अशा स्थितीत प्रशासनाने कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असा सूर उमटत आहे.

सोशल नेटवर्किंग साईट्सवर जनजागृती
दरम्यान, ‘नायलॉन’च्या मांज्यामुळे होणाऱ्या धोक्यांबाबत ‘सोशल नेटवर्किंग साईट्स’वर प्रतिक्रिया उमटत आहे. स्वत:च्या बेजबाबदारपणामुळे दुसऱ्यांना मरणाच्या दारात ढकलणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल करायला हवा अशी भावना ‘नेटीझन्स’ने व्यक्त केली. अनेकांनी तर फेसबुक, टष्ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मांज्यांमुळे दुचाकी चालविताना मनात किती दहशत असते किंवा अपघात कसा पाहिला याचे वर्णनच केले. अनेकांनी ‘नायलॉन’ मांजा न वापरण्याचा ‘आॅनलाईन’ संकल्पदेखील केल्याचे दिसून आले.

नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखावी
त्यामुळे असा दिखावा होणार असेल तर ओरड करण्यात काहीच अर्थ नाही. जर या ‘मांजा’सुरापासून सुटका हवी असेल तर नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून वागायला हवे. पतंग उडविणे काहीच गैर नाही, परंतु त्यासाठी पारंपारिक व कुठलाही धोका नसलेला मांजा वापरणे कधीही चांगले. नागरिकांनी स्वत:हूनच हा मांजा घेणार नाही असा संकल्प करायला हवा असे मत हितेश डोर्लीकर या तरुणाने व्यक्त केले.

स्वयंसेवी संघटनांतर्फे जनजागृती
मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘सेव्ह स्पीचलेस आॅर्गनायझेशन’ या स्वयंसेवी संघटनेतर्फे ‘नायलॉन’ मांजासंदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीदेखील सहभागी झाले होते. नागरिकांनी ‘नायलॉन’ मांजा वापरू नका असे आवाहन यावेळी संविधान चौक येथे करण्यात आले. पतंग कापण्यासाठी कुणाचा गळा कापल्या जाणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. काही वेळासाठी लोकांचा खेळ होतो, मात्र यामुळे दरवर्षी शेकडो पक्षी जखमी होतात व अनेकांचा बळीदेखील जातो. याबाबत तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत संघटनेच्या संस्थापिका व अध्यक्ष स्मिता मिरे यांनी व्यक्त केले.

Web Title: say No To 'Nylon' Manza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.