म्हणे... 'आम्ही महिन्याला ३० ते ४० टक्के लाभ देऊ'; नागपुरात इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या सात संचालकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 08:27 PM2022-04-12T20:27:03+5:302022-04-12T20:27:31+5:30

Nagpur News ३० ते ४० टक्के परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून त्यांना परत न करणाऱ्या हॅरिझॉन इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या सात संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Say ... 'We will give 30 to 40 percent profit per month'; Case filed against seven directors of an investment company in Nagpur | म्हणे... 'आम्ही महिन्याला ३० ते ४० टक्के लाभ देऊ'; नागपुरात इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या सात संचालकांवर गुन्हे दाखल

म्हणे... 'आम्ही महिन्याला ३० ते ४० टक्के लाभ देऊ'; नागपुरात इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या सात संचालकांवर गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देशेकडो गुंतवणूकदारांचे ‘हॅरिझॉन’ने कोट्यवधी हडपले

नागपूर : फॉरिक्स ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत दुप्पट, तिप्पट लाभ मिळतो. त्यात तुम्ही गुंतवणूक करा. आमची कंपनी तुम्हाला महिन्याला ३० ते ४० टक्के लाभ देईल, असा दावा करून कंपनीच्या संचालकांनी शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना उघड झाली असून, कंपनीच्या सात संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हजारो गुंतवणूकदारांना श्रीसूर्या, वासनकरने कोट्यवधींचा गंडा घालून अनेकांना रस्त्यावर आणले आहे. त्यात पुन्हा असा फसवणुकीचा फंडा सुरू झाल्याने सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हॅरिझॉन इन्व्हेस्टमेंट असे या कंपनीचे नाव आहे. हुडकेश्वरच्या ताजेश्वरी नगरात या कंपनीचे कार्यालय आहे. अभिषेक गजानन पाच्चाव (वय ३८), गजानन पाच्चाव (वय ५८, रा. रेणुकामाता नगर), रमाकांत कुलकर्णी (वय ६०, रा. सुदर्शननगर), रोशन भिवापूरकर (वय ४५, रा. दिघोरी), करण आकरे (वय ३२, रा. हुडकेश्वर), विक्की टाले (वय ३०, रा. पिपळा फाटा) आणि त्यांची एक महिला साथीदार या सर्वांनी २०२० मध्ये ही कंपनी सुरू केली. आमच्या कंपनीत फॉरिक्स ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत दुप्पट, तिप्पट लाभ मिळतो. त्यात तुम्ही गुंतवणूक करा. आमची कंपनी तुम्हाला महिन्याला ३० ते ४० टक्के लाभ देईल, अशी बतावणी कंपनीचे उपरोक्त आरोपी नागरिकांना करत होते. त्यांनी जागोजागी नेमलेले एजंट गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे मृगजळ दाखवत होते. त्याला बळी पडून शेकडो गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्यभराची जमविलेली पुंजी कंपनीत गुंतवली.

प्रारंभी आरोपींनी काही जणांना व्याज दिले. मात्र, कागदोपत्री दिलेले हे व्याज गुंतवणुकीच्या मूळ रकमेशी जोडून त्यात रक्कम वाढल्याचे दाखविले. ही बनवाबनवी लक्षात न आल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीत गर्दी केली. दरम्यान, ठराविक मुदतीनंतर पैशाची गरज पडल्याने गुंतवणूकदार आपली रक्कम परत घेण्यासाठी कंपनीत गर्दी करू लागले. कधी कोरोनाचे संकट तर कधी इतर कोणते कारण सांगून आरोपींनी त्यांना झुलविणे सुरू केले. १ नोव्हेंबर २०२१ नंतर आरोपींनी गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली, त्यामुळे गुंतवणूकदारांची अस्वस्थता वाढली. आपली रक्कम परत मिळावी म्हणून गुंतवणूकदारांनी कंपनीच्या उपरोक्त आरोपी संचालकांकडे तगादा लावला. त्यांनी प्रतिसाद देणे बंद केल्याने अखेर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

प्रदीर्घ चाैकशी, अखेर गुन्हा दाखल

हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणाची चाैकशी केल्यानंतर वैभव सुरेशराव पांडव (वय ४०) यांच्या तक्रारीवरून सोमवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी आपले १० लाख रुपये हडपल्याचे पांडव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आकडा फुगू शकतो

प्राथमिक चाैकशीत ७४ लोकांकडून आरोपींनी ३ कोटी ६१ लाख ७४ हजार रुपये हडपल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हा आकडा फारच छोटा आहे. तो फुगू शकतो, असे पोलीस सांगतात. फसवणूक झालेल्यांची संख्या एक हजारपेक्षा जास्त असून, आरोपींनी गिळंकृत केलेली रक्कम ५० कोटींच्या घरात असावी, असा पोलिसांचा संशय आहे. ठाणेदार कविता इसारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.

------

Web Title: Say ... 'We will give 30 to 40 percent profit per month'; Case filed against seven directors of an investment company in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.