साेयाबीन; काेणतेही वाण पेरा, नुकसान अटळ! पेरणीक्षेत्र हाेत आहे कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 09:55 PM2021-09-14T21:55:09+5:302021-09-14T22:20:55+5:30
Nagpur News सन २०१४-१५ पासून राेग व किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या उत्पादनात घट व्हायला सुरुवात झाली.
सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नगदी पिकांमध्ये कपाशीला पर्याय म्हणून साेयाबीनला प्रथम पसंती दर्शविली हाेती. सुरुवातीला उत्पादनाचा कमी काळ व उत्पादनखर्चात अधिक उत्पादन हाेत असल्याने तसेच चांगला बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यात साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र, सन २०१४-१५ पासून राेग व किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या उत्पादनात घट व्हायला सुरुवात झाली. वाढता उत्पादनखर्च व मिळणारा कमी बाजारभाव यामुळे दरवर्षी पदरात ताेटाच पडताे. हल्ली काेणतेही वाण पेरा, नुकसान अटळ आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील साेयाबीन उत्पादकांनी व्यक्त केली आहे. परिणामी, जिल्ह्यातील साेयाबीन पेरणीक्षेत्र कमी हाेत आहे. (Sayabeen; Sow any variety, loss is inevitable! Sowing area is low)
साेयाबीन हे सरळ वाण असल्याने यात हायब्रीड वाण उपलब्ध नाही. अलीकडे शेतकरी साेयाबीनचे कमी काळात येणारे (अर्ली व्हेरायटी-८५ ते ९० दिवस), मध्यम काळात येणारे (मीडियम व्हेरायटी-९० ते १०० दिवस) व उशिरा येणारे (लेट व्हेरायटी-१०५ ते १२० दिवस) वाण पेरणीसाठी वापरतात. यात अर्ली व मीडियम व्हेरायटीला अधिक प्राधान्य दिले जात असले तरी या दाेन्ही व्हेरायटी राेग व किडींना माेठ्या प्रमाणात बळी पडतात. लेट व्हेरायटीचे साेयाबीन तुलनेत राेग व किडींना कमी बळी पडत असले तरी कापणीच्या काळात परतीचा पाऊस येत असल्याने नुकसान हाेते.
जेएस-७१०५ (लेट व्हेरायटी) याच वाणापासून साेयाबीनच्या तिन्ही व्हेरायटींमधील विविध वाण विकसित करण्यात आले आहे. हे सर्व वाण संशाेधित म्हणून ओळखले जातात. यात जेएस-३३५, जेएस-९३०५, जेएस-९७५२, जेएस-९५६०, एमएयूएस-७१, एमएयूएस-८१, एमएयूएस-७०, एमएयूएस-८१, एमएयूएस-१५८, एमएयूएस-४७, एमएयूएस-४७, एमएयूएस-६१, एमएयूएस-६१२, डीएस-२२८ (फुले कल्याणी), केडीएस-३४४ (फुले अग्रणी), एमएसीएस-५, एमएसीएस-४५०, एमएसीएस-१३, एमएसीएस-१२४, एमएसीएस-११८८, एनसीआर-३७, टीएएमएस-९८२१ या वाणांचा समावेश आहे.
कमी काळात येणारे सोयाबीन
कमी काळात (८५ ते ९० दिवस) येणाऱ्या साेयाबीनच्या वाणाला शेतकरी प्रथम पसंती दर्शवितात. या वाणाच्या साेयाबीन पिकावर माेठ्या प्रमाणात खाेडमाशी, चक्रीभुंगा यासह इतर किडींचा तसेच येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेत असल्याने या वाणाचा उत्पादनखर्च वाढत आहे. राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मध्यम काळात येणारे सोयाबीन
मध्यम काळात (९० ते १०० दिवस) येणारे वाण कमी काळात येणाऱ्या वाणाच्या तुलनेत थाेडे चांगले आहे. या वाणाला किडी व राेगाचा प्रादुर्भाव कमी हाेताे. मात्र, या वाणाच्या साेयाबीनला पीक कापणीच्या काळात परतीच्या पावसाचा धाेका उद्भवण्याची शक्यता असते. रबी पिकासाठी शेत तयार करण्याच्या दृष्टीने हे दाेन्ही चांगले असल्याची माहिती साेयाबीन उत्पादकांनी दिली.
अधिक काळात येणारे सोयाबीन
अधिक काळात (१०५ ते १२०) येणाऱ्या वाणाच्या साेयाबीनवर किडी व राेगाचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव हाेत असला तरी पीक कापणीच्या काळात या वाणाला परतीच्या पावसाचा सर्वाधिक धाेका असताे. शिवाय, या वाणामुळे रबीच्या पिकांसाठी शेत तयार करायला कमी काळ मिळत असल्याने रबी पिकांची पेरणी लांबते. त्यामुळे या वाणाचा वापर बराच कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.