वाढदिवसाला हुलकावणी देत घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:08 AM2021-05-18T04:08:45+5:302021-05-18T04:08:45+5:30
- कोरोनाने घातले अनेकांच्या आनंदावर विरजण : वेदनेवर फुंकर घालण्यासाठी उरल्या केवळ स्मृती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना ...
- कोरोनाने घातले अनेकांच्या आनंदावर विरजण : वेदनेवर फुंकर घालण्यासाठी उरल्या केवळ स्मृती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाने अनेकांवर अकाली मृत्यूचे संकट कोसळले आहे. अनेक कुटुंबांत आनंदाचे क्षण साजरे होत असतानाच, ओढवलेल्या मृत्यूने दु:खाचे विरजण पडले आहे. नागपुरातील अविनाश सरोदे यांचा वाढदिवस १८ मे रोजी होता. वयाची ४७ वर्षे पूर्ण करण्याचा हा सोहळा साजरा होत असतानाच, ते कोरोना संक्रमित झाले. हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध नसल्याने ते कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले. तेथून ते घरी परतले आणि वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच त्यांना मृत्यूने कवटाळले. यामुळे संपूर्ण सरोदे कुटुंबीयांवर दु:ख कोसळले आहे.
कौटुंबिक उतार-चढाव प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. अविनाश सरोदे यांच्याही आयुष्यात त्या होत्या. इतरांना मदतीसाठी सदैव तत्पर असणारे अविनाश यांचे वैवाहिक आयुष्य समाधानाचे राहिले नाही. दोन विवाह अपयशी ठरले आणि तिसऱ्या विवाहाने त्यांना स्थैर्य लाभले. पाच महिन्यांचा हा आनंद त्यांना खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या रूपाने साजरा करायचा होता. मात्र, त्यापूर्वीच कोरोनाने त्यांना सगळ्यांपासून हिरावले. विशेष म्हणजे, त्यांच्या प्रकृतीची स्थिती बघता काही हॉस्पिटल्सने त्यांना नाकारले आणि जेथे स्वीकारण्याची तयारी होती तेथे बेड उपलब्ध झाले नाही. कोविड केअर सेंटरमध्ये लागोपाठ बघितलेल्या मृत्यूंच्या तांडवाने ते हादरले आणि जे होईल ते घरीच, या अखेरच्या इच्छेने ते घरी आले आणि घरीच अखेरचा श्वास त्यांनी घेतला. अविनाश यांच्यासारखी अकाली एक्झिट कोरोनाकाळात अनेकांनी घेतली आणि अनेक कुटुंबे आज विरक्त अवस्थेत आली आहेत.