वाहनचालकांच्या हाती स्टेअरिंगऐवजी तराजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:09 AM2021-04-23T04:09:38+5:302021-04-23T04:09:38+5:30
कळमेश्वर : गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विक्राळ रूप धारण करून बसल्याने अनेकांना देशोधडीला लावले आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे ...
कळमेश्वर : गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विक्राळ रूप धारण करून बसल्याने अनेकांना देशोधडीला लावले आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय बुडाले. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. अस्वस्थतेने अनेकांनी व्यवसायाचा मार्ग बदलला. त्यातून खासगी तथा स्कूल व्हॅन चालकसुद्धा सुटले नाहीत.
कळमेश्वर तालुक्यात अनेक तरुणांनी चारचाकी वाहन चालवून त्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. यात अनेक तरुणांनी स्वत:जवळील जमापुंजी तथा कर्ज काढून चारचाकी वाहने विकत घेतली. या चारचाकी वाहनांच्या माध्यमातून नागरिक तीर्थयात्रा, लग्नसमारंभ, साक्षगंध, स्वागत समारंभ, अंत्यसंस्कार, तेरवी आदी कार्यक्रमांना जात असल्याने वाहनचालकांना वर्षभर रोजगार मिळत होता. परंतु गतवर्षीपासून कोरोनाचा कहर वाढल्यानंतर या सर्व समारंभावर गदा आली. मंदिर बंद असल्याने तीर्थयात्रा बंद झाल्या. तसेच चारचाकी वाहनातून प्रवासी मर्यादा सोबतच कोरोना संसर्गाच्या भयामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. अनेक वाहनचालकांनी चारचाकी गाडीचे स्कूल बसमध्ये रूपांतरित करून ग्रामीण भागातून शहरातील शाळेत विद्यार्थ्यांना ने-आण करून आपला उदरनिर्वाह चालविला होता. परंतु शाळाच बंद करण्यात आल्याने स्कूल बसची चाके वर्षभरापासून थांबली आहेत. यामुळे अनेक स्कूल बस चालक तथा मालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
कोरोनामुळे स्कूल बस चालविणे बंद झाल्याने फळ विक्रीचा व्यवसाय सुरू करणारा सतीश डेहनकर याने सांगितले की, सध्या कोरोना काळात कुठेही काम मिळत नसल्याने उदरनिर्वाहाचे दुसरे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे. घराचा किराया, विजेचे बिल, गॅस सिलेंडर, आजार, भाजीपाला, किराणा यासाठी पैसे आणायचे कुठून, या विवंचनेतून सुटका करण्याकरिता फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यातून जगण्यापुरते पैसे मिळतात. तर स्वत:च्या मालकीची गाडी चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालविणारा अतुल पाटील आता दुसऱ्याची रुग्णवाहिका चालवितो. यात रोज रोजगार मिळेल याची शाश्वती नसल्याने त्यांची आई भाजीपाला विक्री करते तर ज्या दिवशी रुग्णवाहिकेवर काम नसल्यास अतुलसुद्धा आईसोबत भाजीपाला विकण्यास मदत करतो.