स्पॉट बुकिंगच्या नावावर एसटी महामंडळात लाखोंचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2022 08:00 AM2022-10-05T08:00:00+5:302022-10-05T08:00:02+5:30

Nagpur News नागपूर भंडारा मार्गावर एसटीच्या नॉन स्टॉप धावणाऱ्या शिवशाही बसेसच्या बुकिंगचे कंत्राट मिळालेल्या ट्रायमॅक्स कंपनीच्या स्थानिक एजंटने लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

Scam of lakhs in ST Corporation in the name of spot booking | स्पॉट बुकिंगच्या नावावर एसटी महामंडळात लाखोंचा घोटाळा

स्पॉट बुकिंगच्या नावावर एसटी महामंडळात लाखोंचा घोटाळा

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर-भंडारा मार्गावरील शिवशाही बसेसच्या बुकिंगमध्ये अफरातफर

दयानंद पाईकराव

नागपूर : नागपूर भंडारा मार्गावर एसटीच्या नॉन स्टॉप धावणाऱ्या शिवशाही बसेसच्या बुकिंगचे कंत्राट मिळालेल्या ट्रायमॅक्स कंपनीच्या स्थानिक एजंटने लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. यात ट्रायमॅक्स कंपनीच्या एजंटनी प्रवाशांकडून प्रवासाचे पूर्ण भाडे वसूल करून त्यांना विविध सवलतींच्या नावाखाली शून्य पैशांचे तिकीट देऊन एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचे उघड झाल्यामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे. घोटाळा उघड झाल्यानंतर याची मौदा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून एसटी महामंडळाने चौकशी सुरु केली आहे. यात एसटी महामंडळातील अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नागपूर-भंडारा मार्गावर एसटी महामंडळाच्या नॉनस्टॉप शिवशाही बसेस धावतात. एकदा नागपूरवरून सुटलेली शिवशाही बस थेट भंडारा येथेच थांबते. एसटी महामंडळाने यासाठी ट्रायमॅक्स कंपनीला स्पॉट बुकिंगचे कंत्राट दिले आहे. ट्रायमॅक्स कंपनीने हे काम नागपुरात एसटी महामंडळाचे कर्मचारी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडे सोपविले. परंतु या व्यक्तींनी स्पॉट बुकिंगच्या नावाखाली नागपूर-भंडारा मार्गावरील शिवशाही बसेसमध्ये अफरातफर सुरू केली. नागपूरवरून शिवशाही बस भंडाराला जाण्यासाठी निघाल्यानंतर जगनाडे चौक आणि त्यानंतर एच. बी. टाऊन येथे थांबते. एच. बी. टाऊन येथे या बसची स्पॉट बुकिंग करण्यात येते. परंतु बुकिंग करताना संबंधित व्यक्तींनी बसमधील प्रवाशांकडून भंडाराचे संपूर्ण प्रवासाचे प्रवासभाडे घेतले. परंतु तिकीट देताना त्यांना आवडेल तेथे प्रवास, क्षयरोगाचे रुग्ण, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यासह विविध सवलतींचे शून्य पैशांचे तिकीट दिले. यातून हे काम करणाऱ्या व्यक्तींनी गेल्या पाच वर्षांत लाखो रुपयांनी एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाला चुना लावल्याचे उघड झाले आहे. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत मौदा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या प्रकरणी एसटी महामंडळाने चौकशी सुरु केली असून अद्याप एकाही व्यक्तीला निलंबित केले नसल्याची माहिती आहे.

असा झाला घोटाळा उघड

एसटीच्या भंडारा मार्गावरील नॉनस्टॉप शिवशाही बसेसची स्पॉट बुकिंग करण्यात येते. नागपुरातून बस सुटल्यानंतर ती थेट भंडारा येथेच थांबते. परंतु २६ सप्टेंबर २०२२ रोजी एसटी महामंडळाच्या भंडारा विभागातील मार्ग तपासणी पथकाने नागपूर-भंडारा शिवशाही बस तपासली. यात कुठल्याच सवलतीत बसत नसलेल्या ४ प्रवाशांना शून्य पैशांचे तिकीट देण्यात आल्याची धक्कादायक माहिती पथकाच्या लक्षात आली.

अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता

एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या नातेवाइकांच्या नावावर स्पॉट बुकिंगचे काम घेतल्याची माहिती आहे. हे दोन्ही कर्मचारी एका संघटनेतही कार्यरत असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. नागपूर विभागात एकूण १० मार्ग तपासणी पथक आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांत या पथकांना हा घोटाळा कसा दिसला नाही? असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. मार्ग तपासणी पथकात तसेच नागपूर विभागातील वाहतूक विभागात काही अधिकारी, कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून ठाण मांडून बसले असल्याची माहिती आहे.

घोटाळ्याची चौकशी सुरू आहे

‘प्रवाशांना शून्य पैशांचे तिकीट देऊन एसटी महामंडळ आणि शासनाची लाखो रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. याबाबत मौदा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून नेमका किती लाखांचा घोटाळा झाला, यात किती जणांचा हात आहे, हे चौकशीअंती समोर येईल.’

-किशोर आदमने, प्रभारी विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर विभाग

..........

Web Title: Scam of lakhs in ST Corporation in the name of spot booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.