जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागात घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:36+5:302021-07-14T04:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रोशन पंजाबराव पाटील, पंजाबराव जंगलूजी पाटील, कमला पंजाबराव पाटील आणि मंजुषा कुसुमकार पाटील अशी या प्रकरणातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रोशन पंजाबराव पाटील, पंजाबराव जंगलूजी पाटील, कमला पंजाबराव पाटील आणि मंजुषा कुसुमकार पाटील अशी या प्रकरणातील कंत्राटदार आरोपींची नावे असून हे सर्व काटोलच्या धंतोली वार्डात राहतात.
एकाच कुटुंबातील हे सर्वच्या सर्व शासनाच्या यादीवरील अधिकृत कंत्राटदार आहेत. ते तलाव, नहर दुरुस्तीची कामे करतात. त्यासाठी आधी बँकेत अनामत रक्कम जमा करावी लागते. आरोपी पाटील कुटुंबीयांनी दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून एका नहर दुरुस्तीचे कंत्राट घेतले होते. त्यासाठी बँके अनामत रक्कमही जमा केली होती. काम पूर्ण झाल्यानंतर आणि अधिकाऱ्यांचे संमतीपत्र मिळाल्यानंतर ही अनामत रक्कम परत मिळते. दरम्यान, अधिकार नसताना कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांची परवानगी न घेता परस्पर लाखोंची रक्कम उचलली. २८ फेब्रुवारी २०१९ ते ६ जुलै २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. तो लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी रमेशकुमार हिरालाल गुप्ता यांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
---
अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी ?
पाटील यांनी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून लाखोंची रोकड उचलण्यासाठी काही कागदपत्रांवर जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी केल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणाला राजकीय गटातटाची पार्श्वभूमी असल्याचीही चर्चा आहे. पोलिसांनी निष्पक्ष चाैकशी केल्यास अशा प्रकारचे अनेक मोठे घोटाळे उजेडात येऊ शकतात, असे बोलले जाते.
----