एमबीए-अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये घोटाळा; बोगस कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 07:13 AM2021-05-28T07:13:04+5:302021-05-28T07:13:26+5:30
Nagpur News २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला आहे. नागपूर विभागातील काही एमबीए व अभियांत्रिकी महाविद्यालयांत बोगस कागदपत्रांच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. ॲडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या पडताळणी प्रक्रियेदरम्यान ही बाब समोर आली आहे.
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला आहे. नागपूर विभागातील काही एमबीए व अभियांत्रिकी महाविद्यालयांत बोगस कागदपत्रांच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. ॲडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या पडताळणी प्रक्रियेदरम्यान ही बाब समोर आली आहे. त्यामुळे विभागातील महाविद्यालयांत झालेल्या प्रत्येक प्रवेशाची बारकाईने तपासणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागात एमबीएत १६ बोगस प्रवेश झाले होते. प्रवेश प्रक्रियेनंतर ऑथॉरिटीतर्फे विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सर्वच अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. यादरम्यान अभियांत्रिकी अभ्यासक्रमातदेखील बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याची प्रकरणे समोर आली. २०२०-२१ मधील एकाही प्रवेशाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या प्रवेशांना ऑथॉरिटीची मान्यता मिळणार नाही. याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर काहीच परिणाम होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश बनावट असल्याचे समोर येईल, त्या महाविद्यालयांना त्याची माहिती देण्यात येईल. यासंदर्भात तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता यासंबंधात काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
असा झाला घोटाळा
मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन झाली होती. कागदपत्रेदेखील ऑनलाइनच दाखल करण्यात आली होती. एआरसी केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी झाली नाही. त्याचा फायदा उचलत काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर प्रवेश केले.