अबब! सव्वा अब्जचे घोटाळे; १७ महिन्यात नागपुरातील फसवणुकीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:17 AM2020-08-10T10:17:21+5:302020-08-10T10:18:26+5:30
२०१९ पासून १७ महिन्यात नागपूर शहरात थोडेथोडकेनव्हे तर सव्वा अब्जहून अधिक रकमेचे आर्थिक घोटाळे समोर आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तसे नवीन नाहीत. ठराविक अंतराने आर्थिक फसवणूक झाल्याची मोठी प्रकरणे समोर येतच राहतात. २०१९ पासून १७ महिन्यात नागपूर शहरात थोडेथोडकेनव्हे तर सव्वा अब्जहून अधिक रकमेचे आर्थिक घोटाळे समोर आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१९ ते मे २०२० या कालावधीत शहरात किती आर्थिक घोटाळ्यांची नोंद करण्यात आली, यात किती रक्कम गुंतली होती, किती प्रकरणात घोटाळ्यांची रक्कम ५० लाखांहून अधिक होती, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.
नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या १७ महिन्याच्या कालावधीत आर्थिक घोटाळ्यांचे एकूण ३० गुन्हे दाखल झाले. या घोटाळ्यांमध्ये १ अब्ज ३२ लाख रुपयांची रक्कम गुंतली होती. विशेष म्हणजे झालेल्या गुन्ह्यांपैकी २४ प्रकरणात गुंतलेली रक्कम ही ५० लाख किंवा त्याहून अधिक होती.
लॉकडाऊनच्या कालावधीत एकच गुन्हा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. २५ मार्च ते ३१ मे या लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश व्यवहार बंदच होते. या कालावधीत आर्थिक फसवणुकीचा केवळ एकच गुन्हा नोंदविण्यात आला. संबंधित गुन्हा तीन हजार चौरस फुटाच्या प्लॉटसंदर्भात होता.
उकल झालेल्या प्रकरणांची माहिती का नाही ?
१७ महिन्याच्या कालावधीत गुन्हे शाखेने आर्थिक घोटाळ्यांच्या किती प्रकरणांची उकल केली व किती प्रकरणे बंद करण्यात आली, याची विचारणा कोलारकर यांनी केली होती. मात्र याबाबत माहिती देण्याचे टाळण्यात आले. मागणी केलेल्या माहितीचा बोध होत नसल्याने प्रत्यक्ष कार्यालयात येऊन सांगावे, त्यानंतर माहिती पुरविण्यात येईल, असे माहिती अधिकाराच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. स्पष्ट शब्दात माहिती विचारली असतानादेखील त्याचा बोध का झाला नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.