पंचायत समितीची बनवाबनवी सुरूच
By admin | Published: July 29, 2014 12:48 AM2014-07-29T00:48:50+5:302014-07-29T00:48:50+5:30
तालुक्यातील मेढा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे स्थानिक सरपंचाने कुणाचीही परवानगी न घेता नामकरण केले. सदर प्रकार चव्हाट्यावर येताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश
शाळा नामकरणप्रकरण : मेढा येथील प्रकार
भिवापूर : तालुक्यातील मेढा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे स्थानिक सरपंचाने कुणाचीही परवानगी न घेता नामकरण केले. सदर प्रकार चव्हाट्यावर येताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललित रामटेके यांनी दिले. मात्र, भिवापूर पंचायत समितीचे पदाधिकारी तथा संबंधित अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्याचा केवळ देखावा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराला स्थानिक लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्याचेही बोलले जात आहे.
मेढा येथील सरपंच नारायण गोडे यांनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे नामकरण ‘स्व. केशवराव पांडुरंगजी गोडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेढा’ असे केले. यासाठी नारायण गोडे यांनी कुणाचाही परवानगी अथवा ग्रामपंचायत व स्थानिक शाळा व्यवस्थापनी समितीच्या सभेत साधा ठरावही पारित केला नाही.
याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी ११ जुलै रोजी खंडविकास अधिकाऱ्याकडे तक्रार केली. या संदर्भात लोकमतमध्ये १५ व २१ जुलै रोजी वृत्तही प्रकाशित करण्यात आले. सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची ग्वाही पंचायत समिती सभापती कुंदा कंगाले व गटशिक्षणाधिकारी डब्ल्यू. डी. कुमरे यांनी दिली होती. ही चौकशी सोमवारी (दि. २१) करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. याला आठवडा लोटला असून, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली नाही.
पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने या प्रकरणाची चौकशी सोमवारी (दि. २१) करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, गटशिक्षणाधिकारी मंगळवारी (दि. २२) शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून केवळ मुख्याध्यापकाकडून खुलासा मागितल्याचे कळवितात. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणे तर सोडा, साधी चौकशी करून सदर नाव मिटविण्याचे धाडस कुणीही करीत नाही. आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेता आपले मतदार नाराज होऊ नये, यासाठी केवळ चौकशीचा चोथा चघळणे सुरू आहे. या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यापालन अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
‘खुलासा’वर अडकली चौकशी
या संदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पत्र पाठविले. या पत्राची प्रतिलिपी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षालाही पाठविण्यात आली. ‘उच्च प्राथमिक शाळा मेढा येथे विस्तार अधिकारी प्रकाश लेदे यांनी भेट दिली. सदर शाळेवर नाव लिहिण्याबाबत या कार्यालयाची कुठलीही परवानगी घेतली नाही. याबाबत संबंधित मुख्याध्यापकास खुलासा मागविण्यात आला आहे.
खुलासा प्राप्त होताच आपणास सादर करण्यात येईल’ असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सदर पत्र पंचायत समितीच्या लेटर पॅडवर न लिहिता साध्या कागदावर लिहिले असून, त्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचा शिक्का मारला नाही.