क्यूआर कोड स्कॅन करणे महागात पडले; ऑनलाईन फ्रीज विक्रीतून १० लाख रुपयांनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 08:50 PM2021-11-29T20:50:41+5:302021-11-29T20:51:21+5:30
Nagpur News जुना फ्रीज विकत घेणाऱ्या खरेदीदाराने क्यू आर कोड पाठवला व तो स्कॅन करायला लावला. त्या आधारे महिलेच्या खात्यातून तब्बल १० लाखांची रक्कम लांबवली.
नागपूर : अलीकडे ऑनलाइन खरेदी-विक्रीसाेबतच फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहे. सावनेर शहरातील महिलेचे घरातील जुना फ्रीज विकण्यासाठी ऑनलाइन पाेस्ट टाकली. त्या फ्रीजला खरेदीदार मिळाल्याने साैदाही ठरला. मात्र, खरेदीदाराने पैसे देण्याच्या निमित्ताने फ्रीज विक्रेता महिलेला विश्वासात घेत, क्यूआर कोड पाठवून ताे स्कॅन करायला लावला. त्या आधारे खरेदीदाराने विक्रेता महिलेच्या खात्यातून तब्बल १० लाख २६ हजार रुपयांची परस्पर उचल करीत तिची फसवणूक केली. हा प्रकार साेमवारी (दि.२९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.
रिना राजाराम गोसाई, रा.माैनीबाबा राेड, गुजरखेडी, सावनेर यांना त्यांच्या घरातील जुना फ्रीज विकायला असल्याने, त्यांनी ‘ओएलएक्स’ या ॲपवर फ्रीज विकण्याबाबतची माहिती अपलाेड केली. राजेश कुमार नावाच्या व्यक्तीने ताे फ्रिज ४,५०० रुपयांत विकत घेण्याची ऑनलाइन इच्छा व्यक्त केली. त्याला रिना गाेसाई यांनी हाेकार दर्शविला. पुढे राजेश कुमार याने माेबाइल फाेनवर संपर्क केला व फ्रीजचे पेमेंट ऑनलाइन करीत असून, मुलाला फ्रीज घेण्यासाठी पाठविताे आहे, अशी रिना गाेसाई यांना बतावणी केली.
रक्कम ट्रान्सफर हाेत नसल्याचे सांगून राजेश कुमार याने रिना गाेसाई यांना त्यांच्या माेबाइल फाेनवर स्कॅन काेड पाेस्ट करून क्यूआर कोड स्कॅन करायला लावला. क्यूआर कोड स्कॅन करताच, राजेश कुमार याने रिना गाेसाई यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या सावनेर शाखेतील खात्यातून १० लाख २६ हजार रुपयांची उचल केली. ही बाब लक्षात येताच, रिना गाेसाई यांनी पाेलिसात धाव घेतली. या प्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
अशी केली रकमेची उचल
राजेश कुमार याने रिना गाेसाई यांना स्कॅन कोड पाठवून आधी त्यांच्या खात्यात दोन रुपये आणि नंतर दोन रुपये असे एकूण चार रुपये जमा केले. त्यानंतर, त्याने ४,४९८ रुपये खात्यात ट्रान्सफर हाेत नसल्याचे रिना गाेसाई यांना सांगून ती रक्कम मशीनद्वारे खात्यात जमा करीत असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने रिना गाेसाई यांना क्यूआर काेड स्कॅन करायला लावला. रिना गाेसाई यांनी हा काेड स्कॅन करताच, त्यांच्या बचत खात्यातील २२,५६१ रुपये आणि एफडी खात्यातील ९ लाख ८० हजार ६३० रुपये असे एकूण १० लाख २६ रुपयांची परस्पर उचल केली.
अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी बँक व पाेलीस अधिकारी खातेदारांना वारंवार सूचना देत, बँक खाते, एटीएम व क्रेडिट कार्ड क्रमांक, त्यांचे पिन नंबर, तसेच बँक खात्याबाबतची काेणतीही गाेपनीय माहिती कुणालाही देऊ अथवा सांगू नका. बँक अधिकारी ही माहिती कधीही फाेनवर विचारत नाहीत. माेबाइल फाेनवर प्राप्त हाेणाऱ्या संशयास्पद लिंक क्लिक करू नका, यासह अन्य बाबींबाबत वारंवार आवाहन करीत असते. मात्र, नागरिक या बाबी गांभीर्याने घेत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत.