नागपुरात अॅन्टीरेबीज लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:06 AM2018-06-24T00:06:17+5:302018-06-24T00:07:49+5:30
श्वान चावल्यानंतर रेबीजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबीज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्येही ही लस केवळ दारिद्र्य रेषेखालील रुग्णाला तेही त्याने सोबत शिधापत्रिका आणली असेल तरच दिली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्वान चावल्यानंतर रेबीजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबीज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्येही ही लस केवळ दारिद्र्य रेषेखालील रुग्णाला तेही त्याने सोबत शिधापत्रिका आणली असेल तरच दिली जाते.
श्वानदंशामुळे दरवर्षी साधारण २० हजार लोकांचा ‘रेबीज’मुळे मृत्यू होतो. यात १५ वर्षे वयोगटाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. लस न टोचलेली कुत्री मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो. विशेष म्हणजे, श्वान चावल्यानंतर देण्यात येणारी लसीची किंमत गरिबांना परवडणारी नाही. यातही केवळ ‘बीपीएल’च्या रुग्णांनाच ही लस उपलब्ध करून देण्याचे मेयो, मेडिकलचे धोरण आहे. सध्या तरी या दोन्ही रुग्णालयात अॅन्टीरेबीज लस नसल्याचे सांगण्यात येते. मेयो व मेडिकलमध्ये आठवडाभरात सुमारे ७० ते ८० वर अॅन्टीरेबीज लसीची गरज भासते. महिन्याची सरासरी काढली तर मेडिकलला दरमहा ५०० अॅन्टीरेबीज लसी लागतात. ही लस ‘इंडियन इम्युनॉलॉजिकल’कडूनच मिळते. मात्र मागणीच्या तुलनेत फार कमी साठा पुरवठादाराकडून मिळतो. परिणामी, तुटवडा निर्माण होतो.
‘हाफकीन’कडून लसीची प्रतीक्षा
वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मेडिकलला औषध पुरवठा करण्याची जबाबदारी ‘हाफकीन कॉर्पाेरेशन’कडे देण्यात आली आहे. परंतु या हाफकीनकडून अद्यापही अॅन्टीरेबीज लसीसह इतरही आवश्यक औषधे उपलब्ध न झाल्याने दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.
सुटीच्या दिवशी मिळत नाही लस
मेयो, मेडिकलमध्ये या लसीचा तुटवडा पडल्याने कुत्रा चावलेल्यांना महापालिकेच्या इस्पितळांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. मनपाच्या सदर आणि महाल येथील इस्पितळांमध्ये अॅन्टीरेबीजची लस उपलब्ध आहे. परंतु रविवार व इतर सुटींच्या दिवशी ही दोन्ही इस्पितळे बंद राहत असल्याने रुग्णांची बोळवण होत आहे. इतर दिवशीही ठराविक वेळेतच ही लस मिळते. यामुळे गरिबांनी करावे काय, हा प्रश्न पडला आहे.