रक्तगटाच्या प्लेटलेटस्चा तुटवडा
By admin | Published: November 11, 2014 01:02 AM2014-11-11T01:02:57+5:302014-11-11T01:02:57+5:30
उपराजधानी डेंग्यूच्या तापाने फणफणली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २५८ जणांना डेंग्यू झाला आहे. सद्यस्थितीत शासकीयसह अनेक खासगी इस्पितळे या रोगाच्या रुग्णाने फुल्ल आहेत.
रुग्ण अडचणीत : रुग्णांची गरज ओळखून वाढतात किमती
नागपूर : उपराजधानी डेंग्यूच्या तापाने फणफणली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २५८ जणांना डेंग्यू झाला आहे. सद्यस्थितीत शासकीयसह अनेक खासगी इस्पितळे या रोगाच्या रुग्णाने फुल्ल आहेत. यात रक्तातील प्लेटलेटस् झपाट्याने कमी होतात. परिणामी प्लेटलेटस्च्या मागणीत वाढ झाली असून सर्वच रक्तपेढ्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात याचा तुटवडा पडला आहे. विशेष म्हणजे तातडीच्या, मध्यरात्रीच्या किंवा दुर्मिळ रक्तगटाच्या प्लेटलेटस्ला काही रक्तपेढ्या मनमानेल किमती आकारत असल्याची माहिती आहे.
हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेटस् हाही रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचे तसेच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचे काम या ‘प्लेटलेटस्’ नावाच्या पेशी करतात. या पेशी ‘प्लेट’प्रमाणे दिसतात. त्यामुळे ‘प्लेटलेटस्’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिले आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘थ्रोम्बोसाईट्स’ म्हणतात. डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेटस्ची संख्या अचानक कमी होऊ शकते. सध्याच्या स्थितीत महानगरपालिकेच्या आकडेवारीच्या चारपट रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. यातील बहुसंख्य रुग्ण गंभीर स्वरुपाचे असल्याने डॉक्टर प्लेटलेटस्ची मागणी करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रक्तपेढीत दरदिवसाला विविध रक्त गटाच्या प्रत्येकी चार-पाच प्लेटलेटस्च्या पिशव्या तयार केल्या जातात. मात्र, अनेकवेळा याचा तुटवडा पडत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती खासगी रक्तपेढ्यांमधील आहे. डॉक्टरांच्या मते, रुग्णाला रक्तस्राव होत असेल आणि प्लेटलेटस्चे प्रमाण २० हजारापेक्षा खाली गेले असेल किंवा रक्तस्राव न होता दहा हजारापेक्षा कमी गेले असेल तेव्हाच प्लेटलेटस् लावले जाते. परंतु सद्यस्थितीत निगेटिव्ह रक्त गटाच्या प्लेटलेटस् मिळणे कठीण झाले आहे. यामुळे रुग्ण अडचणीत येत आहेत.
रुग्णांची गरज ओळखून वाढतात किमती
काही रक्तपेढ्या रुग्णांची गरज ओळखून प्लेटलेटस्च्या किमतीत चढ-उतार करीत असल्याची माहिती आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या तक्रारीनुसार रात्री-बेरात्री, तातडीच्यावेळी किंवा दुर्मिळ रक्त गटाच्या प्लेटलेटस्ची मागणी केल्यास किमतीत वाढ होते. (प्रतिनिधी)