कच्च्या मालाच्या टंचाईने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:45+5:302021-05-21T04:07:45+5:30
जुन्या ऑर्डरवर परिणाम : पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्या नागपूर : औद्योगिक क्षेत्राला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत काही महिन्यांपासून वाढ ...
जुन्या ऑर्डरवर परिणाम : पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्या
नागपूर : औद्योगिक क्षेत्राला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत काही महिन्यांपासून वाढ होत असल्याने लघू आणि मध्यम उद्योगांच्या उत्पादनांत घसरण झाली आहे. तसे पाहता देशात फिनिश मालाला मागणी कमीच आहे. शिवाय कच्च्या मालाच्या टंचाईने लघू व मध्यम उद्योगांवर परिणाम झाला आहे. जुन्या दरात ऑर्डर कशी पूर्ण करायची, याची चिंता उद्योजकांसमोर आहे.
सध्या भारतात कच्च्या मालाच्या निर्यातीत वाढ झाल्याने किमती वाढल्या आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती गेल्या तीन महिन्यांपासून आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे कच्च्या मालाची उपलब्धता कमी आहे. मुख्यत्वे, स्टील, ग्रॅन्युअल्स, क्राफ्ट पेपर्स, केमिकल्स, प्लास्टिक, कॉटन, आदी कच्च्या मालाची कमतरता आहे. देशस्तरावरील असोसिएशनने कच्च्या मालाच्या उपलब्धतेबाबत केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. त्यातच अॅल्युमिनियम, पितळ, तांबे आणि विविध प्रकारच्या स्टीलची किंमत ५० ते ७० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे अनेक लघू व मध्यम उद्योगांनी उत्पादन बंद केले आहे. याशिवाय स्टील उद्योगाला लागणारा ऑक्सिजन आता वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयोगात येत असल्याचा परिणाम स्टील उद्योगावर झाला आहे. काही उद्योग या कारणाने बंद पडले आहेत.
कच्च्या तेलाशी जुळलेल्या प्लास्टिकच्या भावात निरंतर वाढ होत आहे. उद्योजक म्हणाले, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने जुन्या दरावर घेतलेली ऑर्डर पूर्ण करणे कठीण होत आहे. त्यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. शिवाय गुंतवणूक वाढली आहे. कच्च्या मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरगुती उत्पादनात त्याची टंचाई जाणवत आहे.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद कानडे म्हणाले, देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने औद्योगिक उत्पादनाला मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. सध्या बाजारात फिनिश गुडची मागणी कमी झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती तीन महिन्यांपासून वाढल्या आहेत. जुन्या ऑर्डर पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.