नागपूर जिल्ह्यात टंचाईच्या झळा : १९ गावात सुरू झाले टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:55 PM2019-04-20T22:55:55+5:302019-04-20T22:57:04+5:30
एप्रिल महिना अर्ध्यातच आला असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहे. विशेष म्हणजे टंचाईची सर्वाधिक झळ शहरालगतच्या गावांना बसत आहे. जिल्हा परिषदेने आत्तापर्यंत एकूण १९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. अन्य गावांमधूनही टँकरची मागणी होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट गावांमध्ये पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा अंदाज पाणी पुरवठा विभागाचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिल महिना अर्ध्यातच आला असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहे. विशेष म्हणजे टंचाईची सर्वाधिक झळ शहरालगतच्या गावांना बसत आहे. जिल्हा परिषदेने आत्तापर्यंत एकूण १९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. अन्य गावांमधूनही टँकरची मागणी होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट गावांमध्ये पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा अंदाज पाणी पुरवठा विभागाचा आहे.
१९ गावांमध्ये २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. यात बिडगाव, लावा, सुराबर्डी, बोथली, खापा निपाणी, मोहगाव ढोले, गिदमगड, गोठणगाव, सुकळी कलार, वलनी, मौराळा, सीताखैरी, नीलडोह, कवडस, तांडा, खापरी रेल्वे, मोटाड पांजरी, पिंडकापार आणि व्याहाड या गावांचा समावेश आहे. यातील बहुतांश गावे ही शहरालगतची आहेत. कामठी तालुक्यातील बिडगाव वगळता अन्य सगळी गावे ही हिंगणा आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील आहेत. नीलडोह येथे सर्वाधिक ७८ फेऱ्या होत आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यातील ३५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. परंतु, यंदा पाणीटंचाई अधिक जाणवणार असल्याची पूर्ण कल्पना जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. यंदा ६८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
टंचाई आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील एकूण १२८४ गावांमध्ये विविध उपाययोजना आखल्या आहेत. यात विंधन विहीर, विहीर खोलीकरण, गाळ काढणे आदी कामांचा समावेश आहे. आत्तापर्यंत केवळ १३० गावांमध्ये या उपाययोजना पूर्ण झालेल्या आहेत. जवळपास १० टक्के काम पुर्ण झाले आहे.
बोअरवेलच्या कामाची गदी मंद
२०१९ पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४९० गावांमध्ये ८१२ बोअरवेल तयार करण्याचा प्रस्ताव होता. तीन टप्प्यांमध्ये बोअरवेलची कामे होणार होती. पहिल्या टप्प्यामध्ये ११३ गावात १७३ बोअर, दुसऱ्या टप्प्यात ३०६ गावात ५२० व तिसऱ्या टप्प्यात ७१ गावात ११९ बोअर होणार होते. परंतु, पहिल्या दोन्ही टप्प्यांत कंत्राटदारांनी सहकार्य न केल्यामुळे बोअरवेलची कामे सुरू होण्यास विलंब झाला. आत्तापर्यंत एकूण ३० गावांमधील कामे पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप ही कामे संथगतीने सुरू असून, ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याची गरज व्यक्त होत आहे.