नागपूर विभागात पाण्याची भीषणता आणखी तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 09:34 PM2019-05-16T21:34:11+5:302019-05-16T21:38:20+5:30
संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गोसीखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा आणि बावनथडी यासारखे मोठे प्रकल्प तर रिकामे आहेत. या धरणात केवळ ० टक्के इतका साठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे, हे विशेष.
नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला ( १६ मे रोजी) केवळ २२२ दलघमी(६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३६ दलघमी (२६ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये ९ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १५ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १८ टक्के, सिरपूर २० टक्के, पुजारी टोला १० टक्के, कालीसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ६ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३० टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये ६ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ५ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.
पाच वर्षातील स्थिती
वर्ष (१६ मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा
२०१९- २२२ दलघमी
२०१८ - ८०६ दलघमी
२०१७ - ४०१ दलघमी
२०१६ - ७८५ दलघमी
२०१५- ८४३ दलघमी
२०१४ - १५४६ दलघमी
मध्यम व लघु प्रकल्पातील साठाही होतोय कमी
नागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात १६ मे रोजीपर्यंत केवळ ७२ दलघमी म्हणजेच १३ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४८ दलघमी म्हणजेच १० टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.