बाजारपेठा विखुरल्याने शेतकऱ्यांना भाज्या विकताना होतोय आर्थिक तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 09:38 PM2020-04-21T21:38:37+5:302020-04-21T21:39:40+5:30
भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांनी अनावश्यक गर्दी केल्याने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजाराला शहराच्या विविध भागात विभागले. त्यानुसार शहरातील बाजारांमध्ये व्यापारी आणि अडतिया व्यवसाय करीत आहेत. पण या विखुरलेल्या बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांनी अनावश्यक गर्दी केल्याने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजाराला शहराच्या विविध भागात विभागले. त्यानुसार शहरातील बाजारांमध्ये व्यापारी आणि अडतिया व्यवसाय करीत आहेत. पण या विखुरलेल्या बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागत आहे.
विहीरगाव येथील उत्पादक शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, कळमन्यात एक दिवसाआड भाज्या विक्रीसाठी नेत होतो. पण ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजार बंद झाला आणि आम्हाला फटका बसला. वाहतुकीचा खर्च वाढला आहे. ठरलेल्या अडतियाकडे माल विक्रीसाठी नेताना दिवसभर मालाच्या विक्रीसाठी वाट पाहावी लागते. एवढेच नव्हे तर माल जागेवर खाली करण्याचे आदेश असतानाही अडतिया माल खाली करीत नाही, शिवाय मालाचे पैसेही वेळेत मिळत नाही.
यंदा पावसाने मध्यंतरी हजेरी लावल्याने भाज्यांचे जास्त उत्पादन झाले. सर्वांच्या शेतात जास्त माल आहे. दररोज कापणी करून विकला नाही तर शेतातच खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे बाजारात कमी प्रमाणात माल नेत आहे. घरी परतीच्या घाईने माल विकून मोकळे व्हावे लागत आहे. बाजारात नेणारा माल चांगल्या किमतीत विकला जावा, या अपेक्षेने बाजारात जातो. पण सध्या सर्व शेतकऱ्यांकडून मालाची आवक वाढल्याने किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा कमी पैसे घेऊन घरी परतावे लागत असल्याचे आंबटकर यांनी सांगितले.
कॉटन मार्केटच्या अडतियांनी सांगितले की, येथील ३९ अडतिया आता आठ बाजारात व्यवसाय करीत आहेत. एका अडतियाला शेतकऱ्यांचा दोनच गाड्यांमधील भाजीपाला विकण्याची परवानगी आहे, शिवाय गाड्यांमधील भाज्या रिक्त करून भाज्या विकाव्या लागतात. अटी आणि नियमांचे पालन न केल्यास दंड भरावा लागतो. याकरिता शेतकरी तोडणी केलेला पूर्ण भाजीपाला बाजारात आणत नाहीत. कोरोनामुळे सर्वच आर्थिक गणित बिघडले आहे. अडतियांसोबत शेतकऱ्यांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊननंतर स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. कळमना आणि कॉटन मार्केट या मुख्य बाजारात पूर्ण क्षमतेने भाज्या विक्रीसाठी आल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.