महाविद्यालयात अडकले २० हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तींचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:08 AM2021-03-23T04:08:31+5:302021-03-23T04:08:31+5:30
जिल्ह्यातील महाविद्यालये - ३५० महाविद्यालयात एकूण प्रलंबित अर्ज : २० हजार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती ...
जिल्ह्यातील महाविद्यालये - ३५०
महाविद्यालयात एकूण प्रलंबित अर्ज : २० हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे तब्बल २० हजारावर अर्ज महाविद्यालयांमध्येच पडून आहेत. ३१ मार्च ही अर्ज करण्याची शेवटी तारीख आहे. या आठ दिवसात इतक्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पोहोचणे आवश्यक आहे, अन्यथा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षच नव्हे तर भविष्यच संकटात येईल.
अनुसूचित जाती, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.२०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या तब्बल २० हजारावर माागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज सध्या महाविद्यालयांमध्येच प्रलंबित आहेत. ते अर्ज तातडीने समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे मंजुरीसाठी पोहोचणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
चौकट
- यंत्रणा लागली कामाला
विद्यापीठ विद्यार्थ्यांचे इतर १५ प्रकारचे शुल्क महाडीबीटीकडून अप्रुव्हल करीत नाही, तोपर्यंत महाविद्यालयांना ते शुल्क दिसत नाही. परिणामी ते अर्ज महाविद्यालयातच पडून आहेत. यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. विद्यापीठ व महाडीबीटीत्त्व अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय साधून हे सर्व अर्ज मंजूर करीत आहेत. वॉर्डनसुद्धा कामाला लावण्यात आले आहेत. प्रत्येक वॉर्डनकडे १०-१० महाविद्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते संबंधित महाविद्यालयातील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे काम करतील.
चौकट
३१ मार्चपर्यंत डेडलाईन
शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठीची तारीख ३१ मार्चपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे अर्ज कुठल्याही परिस्थितीत ३१ तारखेपर्यंत समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पोहोचणे आवश्यक आहे. तेव्हा ज्या महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या आयडीला आहेत, ते सर्व अर्ज सहायक आयुक्तांच्या आयडीवर तातडीने मंजुरीसाठी पाठवावे.
डॉ. सिद्धार्थ गायकवाड
प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग