शिष्यवृत्ती परीक्षा होणार २३ मे रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:08 AM2021-04-01T04:08:34+5:302021-04-01T04:08:34+5:30
विद्यार्थ्यांना दिलासा : अर्ज भरण्याचीही वाढविली मुदत नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयातर्फे प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर ...
विद्यार्थ्यांना दिलासा : अर्ज भरण्याचीही वाढविली मुदत
नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयातर्फे प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. ही परीक्षा २५ एप्रिलला होणार होती. परंतु कोरोनामुळे परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी होणार आहे.
२०१५ पर्यंत ही शिष्यवृत्ती परीक्षा चवथा व सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत होती. परंतु शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलल्यामुळे २०१७ पासून वर्ग ५ व ८ साठी परीक्षा घेण्यात येत आहे. जेव्हापासून ही परीक्षा वर्ग ५ व ८ साठी घेण्यात आली. तेव्हापासून परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे विभागाचे निरीक्षण आहे. कोरोनामुळे यावर्षी परीक्षेच्या आयोजनात अडचणी आल्या आहे.
- कोरोनाचा फटका
दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येत होती. यावर्षी कोरोनामुळे विभागाने परीक्षेचे आयोजन २५ एप्रिल रोजी करण्यात आले होते. परंतु पुन्हा कोरोना संक्रमण वाढल्याने परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे संचालनालयाने नियोजन केले आहे.
- १० एप्रिलपर्यंत भरता येईल अर्ज
परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३० मार्च २०२१ होती. नवीन नियोजनात ही मुदत १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.
- या संकेतस्थळावर करता येईल नोंदणी
डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या संकेतस्थळावर वेळापत्रक व माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. शिवाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी नोंदणीही करता येणार आहे.
- शिक्षकांनी व्यक्त केली नाराजी
या परीक्षांच्या तारखात वारंवार बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. शिष्यवृत्तीचे परीक्षार्थी हे वयाने लहान असतात. मे महिन्यातील तापमानाचा विचार करता या महिन्यात ह्या परीक्षा घेणे संयुक्तिक नाही. या परीक्षा जेवढ्या उशिरा घेण्यात येईल, तेवढे लाभ सुद्धा विद्यार्थ्यांना उशिरा मिळेल, अशा प्रतिक्रीया शिक्षकांमधून उमटत आहे.
- जिल्हा परिषदेने उचलली परीक्षा शुल्काची जबाबदारी
शिष्यवृत्ती परीक्षेत सर्व स्तरावरील विद्यार्थी सहभागी व्हावे या हेतूने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी सेस फंडातून ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भारती पाटील, शिक्षण सभापती, जि.प. नागपूर