शिष्यवृत्ती घोटाळा : नागपुरात शाळा समितीच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 09:08 PM2018-01-05T21:08:24+5:302018-01-05T21:11:16+5:30
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश आपल्या बँक खात्यात जमा करून ती रक्कम स्वत: वापरल्याचा गैरप्रकार उघड झाल्यामुळे लकडगंज पोलिसांनी एका शाळा समितीच्या अध्यक्षाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश आपल्या बँक खात्यात जमा करून ती रक्कम स्वत: वापरल्याचा गैरप्रकार उघड झाल्यामुळे लकडगंज पोलिसांनी एका शाळा समितीच्या अध्यक्षाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मधुकर महादेव मस्के (वय ६७) असे आरोपीचे नाव असून ते न्यू नंदनवनमध्ये राहतात.
भांडेवाडीतील जयविजय उच्च प्राथमिक शाळा समितीचे मस्के अध्यक्ष आहेत. शाळेचे बँक खाते युनियन बँकेच्या वर्धमाननगर शाखेत आहे. असे असताना त्यांनी पुन्हा त्याच बँकेत नवीन खाते स्वत:च्या नावे उघडले. ८ मे २०१७ ला शिक्षण विभागाकडून वेतन अनुदान आणि शिष्यवृत्तीचा १ लाख, ४२ हजार, ३५८ रुपयांचा धनादेश शाळेला मिळाला. तो धनादेश शाळेच्या खात्यात जमा न करता मस्केंनी आपल्या बँक खात्यात जमा केला. त्यातील ४० हजारांची रक्कम परस्पर उचलून तिचा गैरवापर केला. हा गैरप्रकार उघड झाल्याबद्दल मस्के यांना शाळा प्रशासनाने विचारणा केली असता त्यांनी असंबद्ध उत्तरे दिली. त्यांनी ती रक्कम स्वत: वापरल्याचे लक्षात आल्यानंतर संजय चिंतामण बोंद्रे (रा. जुना कैलास नगर) यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली मस्केंविरुद्ध गुन्हा दाखल केला.