ढोल-ताशांच्या गजरात झाला शाळा प्रवेश : पहिल्याच दिवशी ३३९१६ उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 10:05 PM2021-01-27T22:05:11+5:302021-01-27T22:07:11+5:30
School begins कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसतानाही, शिक्षण विभागाने ५ ते ८ वर्ग सुरू करण्याच्या घेतलेल्या धाडसी निर्णयाला विद्यार्थ्यांनी व पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसतानाही, शिक्षण विभागाने ५ ते ८ वर्ग सुरू करण्याच्या घेतलेल्या धाडसी निर्णयाला विद्यार्थ्यांनी व पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. शिक्षण विभागाच्या शाळा भेटी अहवालात पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ५ ते ८ वर्गाचे ३३९१६ विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात झाले. कुठे विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.
नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ९ ते १२ वर्गाच्या शाळा १४ डिसेंबरपासून सुरू केल्या. या शाळांना हळूहळू विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम मिळाला. राज्यातील ९ ते १२ वर्गाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता, ५ ते ८ चे वर्गही सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. नागपूरच्या मनपा आयुक्तांनी हे वर्ग ८ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी २७ जानेवारीपासूनच शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाला सांगितले. बुधवारी जिल्ह्यातील १७८८ शाळांची घंटा वाजली. तब्बल १० महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सावनेर तालुक्यातील जवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. काही शाळांनीही विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर पुष्प देऊन स्वागत केले. जुने मित्र अनेक महिन्यांनंतर भेटल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर प्रसन्नतेचे भाव होते. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून ऑनलाइनवर विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाही, प्रत्यक्ष शिकविण्याचा मोह आवरला नाही. अनेक महिन्यांनंतर बुधवारी शाळांचे वातावरण आनंददायी दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळांमध्ये करण्यात आले होते. पालकांकडून शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्रही घेण्यात आले होते.
शाळा भेटी अहवालातील वस्तुस्थिती
एकूण शाळा - १७८८
एकूण विद्यार्थी - १५०७१७
पहिल्या दिवशीची उपस्थिती - ३३९१६
एकूण शिक्षक - १०६२७
उपस्थित शिक्षक - ५८५४
आरटीपीसीआर केलेले शिक्षक - ५७९७
पॉझिटिव्ह आलेले शिक्षक - ६५
उमरेडमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता
तालुक्यात ९ ते १० वर्गामध्ये असलेल्या लक्षणीय उपस्थितीचा सकारात्मक परिणाम ५ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांवर झाला. तालुक्यातील १३३ शाळांमध्ये पहिल्याच दिवशी ३०१३ विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली. हळूहळू विद्यार्थी संख्या नक्कीच वाढेल, अशी अपेक्षा गटशिक्षणाधिकारी मनोज पाटील यांनी व्यक्त केली.
विद्यार्थी प्रवेश दिनाला उत्स्फूर्त स्वागत
सावनेर तालुक्यातील जवाहरलाल नेहरू विद्यालयात २६ जून रोजी साजरा होणारा विद्यार्थी प्रवेश दिन २७ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला आणि तो सुद्धा जल्लोषात. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर पुष्प उधळून स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात त्यांना वर्गात सोडण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थाचालक अॅड. चंद्रशेखर बरेठिया, मुख्याध्यापक कृष्णकांत पांडव, विजय साबळे, योगेश बन, प्रफुल्ल वडे यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची लकेर दिसून आली.
शाळा फुलल्या, शिक्षकही आनंदले
काटोल तालुक्यातील शाळा बुधवारी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने फुलल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ टक्केच उपस्थिती असली तरी, शिक्षकांना विद्यार्थी दिसल्याने तेही आनंदले होते. जुने मित्र भेटल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले होते. शाळांनी आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्क आवश्यक केले होते. शाळांनी सर्व नियमांचे पालन केल्याचे गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांनी सांगितले.