उमरेड तालुक्यात १५ ला शाळांची वाजणार घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:45+5:302021-07-15T04:07:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : दुनिया डिजिटल झाली असली तरी अद्याप ग्रामीण आणि दुर्गम भागात मोबाईल नेटवर्किंगची समस्या ‘सुरू-बंद’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : दुनिया डिजिटल झाली असली तरी अद्याप ग्रामीण आणि दुर्गम भागात मोबाईल नेटवर्किंगची समस्या ‘सुरू-बंद’ होणारीच आहे. स्थिर आणि उत्तम नेटवर्क अनेक गावांमध्ये अद्यापही होत नसल्याने असंख्य गावखेड्यांना ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा अवलंब करणे कसरतीचे ठरत आहे. अशा परिस्थिती कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत पावले उचलली जात आहेत. उमरेड तालुक्यात गुरुवार (दि.१५) पासून साधारणत: १५ शाळांची घंटा वाजणार आहे. एकूण ४७ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींनी सभा घेत ना हरकतीचा ठराव पारित केला आहे. यामुळे तब्बल दीड वर्षांपासून धूळखात बंद पडलेल्या ग्रामीण भागातील शाळांमधील वर्गखोल्यांचे दरवाजे उघडले जाणार आहे.
उमरेड तालुक्यातील वर्ग १ ते १२ असलेल्या शाळांची संख्या १९२ आहे. शासकीय शाळा १२९ तर अनुदानित शाळांची संख्या ३० आहे. विनाअनुदानित शाळा ३३ असून या संपूर्ण शाळांपैकी वर्ग ८ ते १२ च्या जवळपास १५ शाळा गुरुवारपासून सुरू होतील.
उमरेड तालुक्यातील एकूण १९२ गावांपैकी तब्बल १३२ च्या आसपास गावे कोरोनामुक्त आहेत. आजमितीस तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या केवळ २० असून यामध्ये शहरातील नऊ तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्यात १३९ जणांचा कोरोनामुळे जीव गेलेला आहे. तालुक्यात ७१३७ कोरोना रुग्णांपैकी तब्बल ६,९७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्तीची आकडेवारी अतिशय समाधानकारक आहे.
ऑनलाईन शिक्षणप्रणाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगलीच अडचणीची आणि महागडी ठरत आहे. शिवाय महागडे अँड्रॉईड मोबाईल असंख्य शेतकरी, शेतमजुरांच्या खिशाला परवडणारे नसल्याने सोबतच नेटवर्कची समस्या पाचवीलाच पुजली असल्याने आता खऱ्या अर्थाने योग्य नियमावलींचे पालन करीत शाळा टप्याटप्याने सुरू करणे गरजेचे असल्याचे मत शिरपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता हाडके यांनी व्यक्त केले.
....
या आहेत ग्रामपंचायती
उमरेड तालुक्यातील ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्यास ना हरकत दिली. पालकांनीसुद्धा पुढाकार घेतला. यामध्ये एकूण सात ग्रामपंचायती आहेत. बाह्मणी, आपतूर, बेला, बोरगाव कलांद्री, खैरीबुटी, शिरपूर आणि मटकाझरी अशा एकूण सात ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.
....
आतापर्यंत तालुक्यात सात ग्रामपंचायतींनी ठराव पारित केला आहे. हळुहळू अनेक ग्रामपंचायती पुढाकार घेत आहेत. ग्रामपंचायतींची ना हरकत आणि पालकांचा होकार आल्यास शाळा सुरू करण्यास आम्हास कोणतीही हरकत नाही.
- मनोज पाटील, प्रभारी गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, उमरेड