नागपूर जिल्ह्यातील भोरगडची शाळा आता पुन्हा गजबजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 09:36 PM2018-07-20T21:36:05+5:302018-07-20T21:36:53+5:30
काटोल तालुक्यातील भोरगड येथील बंद पडलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आता शासकीय आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) सुरू होणार आहे. तेथे चार ट्रेड सुरू होणार असून मान्यता मिळाली आहे. कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तसे निर्देश दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार असून लवकरच केंद्राची चमू येणार आहे. केंद्र शासनाकडून हिरवी झेंडी मिळताच भोरगड येथील शाळा आता पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा ‘लोकमत’ने सातत्याने केला, हे विशेष!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल तालुक्यातील भोरगड येथील बंद पडलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आता शासकीय आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) सुरू होणार आहे. तेथे चार ट्रेड सुरू होणार असून मान्यता मिळाली आहे. कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तसे निर्देश दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार असून लवकरच केंद्राची चमू येणार आहे. केंद्र शासनाकडून हिरवी झेंडी मिळताच भोरगड येथील शाळा आता पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा ‘लोकमत’ने सातत्याने केला, हे विशेष!
भोरगड येथे आदिवासी आयुक्तालयाच्या अखत्यारित शासकीय आदिवासी आश्रमशाळा १९८१ मध्ये सुरू झाली. गावातच तब्बल ३२-३३ वर्ष ही शाळा तेथेच भरत होती. दरम्यानच्या काळात नवीन इमारतीला परवानगी मिळून गावाबाहेर भव्य परिसरात शाळा इमारतीसह वसतिगृह, शिक्षकांसाठी क्वॉर्टर उभारण्यात येऊन शाळेचे लोकार्पण झाले. अशात केवळ तीन वर्ष त्या शाळेत वर्ग भरले आणि २०१७ च्या शैक्षणिक सत्रापासून शाळा बंद करण्याचा आदेश निघाला. त्यामुळे शासनाच्या तब्बल २० कोटी रुपयांच्या निधीचा चुराडा झाला. याबाबत ‘लोकमत’ने ‘२० कोटींची शाळा कुलूपबंद’ शीर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आदिवासी विभागाच्या तत्कालीन अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी अधिकाऱ्यांना भोरगड येथे पाठवून ग्रामस्थांचे मत नोंदवून घेतले. त्यानंतर ग्रामपंचायतीने शाळेऐवजी प्रशिक्षण केंद्र, नर्सिंग स्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विभागाकडे पाठविला होता.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काटोल-नरखेड तालुक्यातील विकासकामांसाठी गेले असता बंद शाळेची स्थिती ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांना मंगळवारी मुंबईत चर्चेसाठी बोलविले होते. त्यानुसार पंचायत समिती सभापती संदीप सरोदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळासोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची बैठक पालकमंत्री बावनकुळे यांनी घडवून आणली. त्यात विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येऊन अधिकृत निर्णय पुढील बैठकीत घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यानंतरच्या बैठकीत शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या जागेवर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तसा प्रस्ताव आदिवासी विभागामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने तयार करून तो कौशल्य विकास मंत्रालयाकडे पाठविला. तो प्रस्ताव गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होता.
पावसाळी अधिवेशनात नागपूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भोरगडच्या शाळेच्या प्रस्तावाबाबत कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना विचारणा केली. त्यावर चार ट्रेड सुरू करण्यात येणार असून १५ दिवसात तसे परिपत्रक जारी करण्यात येईल. त्यानंतर केंद्र शासनाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात येणार असून तेथील चमूने हिरवी झेंडी दिल्यानंतर आयटीआय सुरू होणार आहे. या बैठकीला आ. आशिष देशमुख, काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे आदी उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संधी
भोरगड येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत लवकरच आयटीआय सुरू होणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, वायरमन, फिडर आणि कृषी तंत्रज्ञान हे चार ट्रेड राहणार आहे. १७७ विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता असणार आहे. तेथे आदिवासी विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार असल्याने या भागातील विद्यार्थ्यांना ही एक संधी आहे. पहिल्या वर्षी हे चार ट्रेड सुरू झाल्यानंतर पुन्हा त्यात आणखी काही ट्रेडस्ची भर पडण्याची शक्यता आहे. भोरगड येथील बंद पडलेल्या आदिवासी आश्रमशाळेत आयटीआय सुरू करण्याची मागणी काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी लावून धरली. याबाबत त्यांनी पाठपुरावा केला. तसेच याबाबत ‘लोकमत’ने ही मुद्दा उचलून धरला.
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय
बंद पडलेल्या शाळेत आता आयटीआय सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाले. हे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरल्यानेच शासनाला याबाबत विचार करावा लागला. सोबतच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पाठपुरावा केला. आ. आशिष देशमुख यांनी विषय उचलला. शाळेऐवजी कौशल्य विकास करण्यासाठी तेथे आयटीआय सुरू करण्याची आदिवासी बांधवांची रास्त मागणी होती. याबाबत पंचायत समितीस्तरावरून पाठपुरावा करण्यात आला. तसा प्रस्ताव सादर केला. अखेर त्याला मूर्त रुप मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. केंद्र शासनाची चमू लवकरच तेथील पाहणी करून हिरवी झेंडी देईल.
- संदीप सरोदे,
सभापती, पंचायत समिती काटोल