हप्ता वाचविण्यासाठी स्कूल बसचा नंबरच बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:28+5:302021-03-21T04:09:28+5:30
- सदर रहदारी विभागाची कारवाई, शांतीनगरमध्ये पकडली बस लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सदर झोनच्या ट्रॅफिक पोलिसांनी फायनान्स कंपनीपासून ...
- सदर रहदारी विभागाची कारवाई, शांतीनगरमध्ये पकडली बस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर झोनच्या ट्रॅफिक पोलिसांनी फायनान्स कंपनीपासून बचाव करण्यासाठी स्कूल बसचा नंबर बदलणाऱ्या वाहनमालकाला पकडले आहे. यशोधरानगर निवासी वसीम गफार शेख (वय २९) असे आरोपी बसमालकाचे नाव आहे.
ट्रॅफिक पोलिसांना पाचपेक्षा अधिक ई-चालान पेंडिंग असणाऱ्या वाहनचालकांना नोटीस जारी करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. त्याअंतर्गत बस क्रमांक एमएच/४०/वाय/७३४२वर चालान पेंडिंग मिळाले; परंतु एकाच नंबरच्या दोन वेगवेगळ्या पांढरी व पिवळी बस (स्कूल) असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने बोगस नंबर असलेली पिवळी स्कूलबस शोधण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती प्रसारित करण्यात आली. शनिवारी २० मार्च रोजी शांतीनगरचे हवालदार सुभाष लांडे यांना या क्रमांकाची बस शांतीनगर येथे उभी असल्याची माहिती दिली. ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून बसचालक प्रतीक पदमगीरवारला माहिती विचारली. त्याने बस वसीम शेखच्या मालकीची असल्याचे सांगितले. वसीमला बोलावून विचारपूस केल्यावर फायनान्स कंपनीकडून वारंवार हप्ता भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याने, नातेवाईक मुबारक शेखच्या बसचा क्रमांक स्कूलबसवर लावल्याचे वसीमने सांगितले. त्यानंतर आरोपी वसीम शेख व चालकाच्या विरोधात शांतीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
.............