स्कूलबस उलटली; १५ विद्यार्थिनी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 10:55 PM2019-12-02T22:55:52+5:302019-12-02T22:57:19+5:30

चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली स्कूलबस रोडच्या खाली उतरली. रोडलगत खोलगट भाग असल्याने ती उलटली. त्यात बसमधील १५ विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली.

School bus over turned; 15 students injured | स्कूलबस उलटली; १५ विद्यार्थिनी जखमी

स्कूलबस उलटली; १५ विद्यार्थिनी जखमी

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील वाकेश्वर शिवारातील घटना : रोडच्या कडेला खोलगट भाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (बुटीबोरी) : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली स्कूलबस रोडच्या खाली उतरली. रोडलगत खोलगट भाग असल्याने ती उलटली. त्यात बसमधील १५ विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. ही घटना कुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकेश्वर शिवारात सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये जान्हवी उईके, गौरी धुर्वे, अनन्या सरोज, श्रेया वरकडे, शिवानी नामूर्ते, खुशी परिहार, कशीश पटेल, नीतू अंबाडरे, गायत्री गायकवाड, अंजली वरठी, नंदिनी भोजने, अनुष्का वांदिले व कशीश भिमटे यांच्यासह अन्य दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. या सर्व नागपूर येथील लक्ष्मीदेवी धीरन कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. बुटीबोरी परिसरातील जंगेश्वर, बोरखेडी (फाटक), बोरखेडी (रेल्वे), बुटीबोरी, सातगाव, मोहगाव, वाकेश्वर व वारंगा येथील एकूण ४० विद्यार्थिनी नागपूर येथील लक्ष्मीदेवी धीरन कन्या विद्यालयात शिकतात. त्या रोज शाळेने नेमून दिलेल्या एमएच-४०/बीजी-७२३४ क्रमांकाच्या स्कूलबसने ये-जा करतात.
सोमवारी सकाळी ही बस विद्यार्थिनींना घेऊन वारंगा येथून बुटीबोरीच्या दिशेने निघाली. बुटीबोरी वारंगा हा मार्ग अरुंद आहे. वाकेश्वर शिवारात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती बस रोडखाली उतरली. रोडलगत खोलगट भाग असल्याने ती लगेच उलटली. त्यात बसमधील १५ विद्यार्थिनी जखमी झाल्या. बस उलटताच बसचालक श्रीराम शिरोडे, रा. ब्राह्मणी याने बस सोडून पळ काढला.
माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून सर्व विद्यार्थिनींना बसमधून बाहेर काढले आणि बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे उपचार केल्यानंतर सर्व विद्यार्थिनींना सुटी देण्यात आली. शिवाय, पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व बस ताब्यात घेत सरळ करून पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केली. वृत्त लिहिस्तो बसचालक श्रीराम शिरोडे यास अटक करण्यात किंवा ताब्यात घेण्यात आले नव्हते.

वर्षभरातील दुसरी घटना
वर्षभरापूर्वी अर्थात १० डिसेंबर २०१८ रोजी याच शाळेच्या स्कूलबसचा बुटीबोरी परिसरातील सालईदाभा शिवारात अपघात झाला होता. त्यात संस्कृती लोकेश वर्मा (१५, रा. सातगाव) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे, बसचालक श्रीराम शिरोडे याला दारूचे व्यसन असल्याची माहिती काही पालकांनी दिली असून, त्याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. याबाबत पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रारही केली होती, असेही काहींनी सांगितले.

Web Title: School bus over turned; 15 students injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.