शाळा-महाविद्यालयांनी सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यावा
By Admin | Published: July 10, 2017 01:37 AM2017-07-10T01:37:40+5:302017-07-10T01:37:40+5:30
समाजातील नव्या बदलांची सुरुवात ही शिक्षण क्षेत्रापासूनच होत असते. जग आता सौरऊर्जेकडे वळत असून राज्यातील महाविद्यालयांनीदेखील यासंदर्भात पुढाकार घेतला पाहिजे.
चंद्रशेखर बावनकुळे : राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या अधिवेशनाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील नव्या बदलांची सुरुवात ही शिक्षण क्षेत्रापासूनच होत असते. जग आता सौरऊर्जेकडे वळत असून राज्यातील महाविद्यालयांनीदेखील यासंदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. सौरऊर्जेचा नियमित व नियोजनबद्ध वापर सुरू झाल्यास ८० टक्के विजेची बचत होऊ शकते, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या ३७ व्या अधिवेशनाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य संघटना व धनवटे नॅशनल कॉलेजतर्फे महाविद्यालयाच्याच परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.अरुण शेळके हे होते. याशिवाय उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, विभागीय सहसंचालक डॉ.अंजली रहाटगावकर, ‘नॅक’चे सल्लागार डॉ.जगन्नाथ पाटील, राष्ट्रीय प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष ब्रह्मभट, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, प्राचार्य डॉ. बबन तायवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात शाळा-महाविद्यालयांचे ‘डिजिटलायझेन’ होत आहे. मात्र भविष्यात विजेची आवश्यकतादेखील वाढणार आहे. त्यामुळे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्या संस्था सौरऊर्जा प्रकल्प उभारतील त्यांना शासन ५० टक्के अनुदान देईल, असे आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिले. उच्चशिक्षणाच्या विकासात प्राचार्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. शिक्षण क्षेत्रासाठी शासनाने आर्थिक तरतूद वाढविण्याची गरज आहे. शिक्षणाचे खासगीकरण वेगाने होत असून हे भविष्यासाठी चांगले नाही.
राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. सुभाष ब्रह्मभट म्हणाले. शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा फटका देशाच्या विकासाच्या गतीला बसेल. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत कामा नये असे अॅड. शेळके म्हणाले. डॉ. तायवाडे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले तर डॉ. टाले यांनी आभार मानले. अधिवेशनात राज्यभरातील ४५० हून अधिक प्राचार्य सहभागी झाले आहेत.