शाळेचे दोन वर्ग भरतात एका खोलीत, दोन व्हरांड्यात आणि एक समाजमंदिरात; नागपूर जिल्ह्यातील भिवापूरचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 12:37 PM2018-01-27T12:37:30+5:302018-01-27T12:37:59+5:30

भिवापूर तालुक्यातील भागेबोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केवळ एकच वर्गखोली असल्याने दोन वर्ग एकाच वर्गखोलीत, दोन वर्ग व ऱ्हांड्यात आणि एका वर्गातील विद्यार्थी समाजमंदिरात बसून ज्ञानार्जन करतात.

The school fills two classes in a room, two verandahs and one community hall; The reality of Bhivapur in Nagpur district | शाळेचे दोन वर्ग भरतात एका खोलीत, दोन व्हरांड्यात आणि एक समाजमंदिरात; नागपूर जिल्ह्यातील भिवापूरचे वास्तव

शाळेचे दोन वर्ग भरतात एका खोलीत, दोन व्हरांड्यात आणि एक समाजमंदिरात; नागपूर जिल्ह्यातील भिवापूरचे वास्तव

Next
ठळक मुद्देभागेबोरी येथील विद्यार्थ्यांची परवड थांबणार कधी?

शरद मिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा ‘डिजिटल’ केल्या जात असताना भिवापूर तालुक्यातील भागेबोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षणाची सोय असून, या पाचही वर्गात एकूण ६४ विद्यार्थी आहेत. येथे केवळ एकच वर्गखोली असल्याने दोन वर्ग एकाच वर्गखोलीत, दोन वर्ग व ऱ्हांड्यात आणि एका वर्गातील विद्यार्थी समाजमंदिरात बसून ज्ञानार्जन करतात. एकीकडे, राज्य शासन कमी पटसंख्येचे कारण पुढे करून शाळा बंद करीत आहे, तर दुसरीकडे पुरेशी पटसंख्या असूनही ग्रामीण विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांसारखी मूलभूत सुविधा पुरविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यावरून शासन व प्रशासन ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.
भिवापूर तालुक्यातील भागेबोरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १९५२-५३ मध्ये दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. या वर्गखोल्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे आहे. या वर्गखोल्यांच्या बांधकामापासून आजवर जिल्हा परिषद प्रशासनाने या वर्गखोल्यांकडे ढुंकूनही बघितले नाही. यातील एक वर्गखोली मोडकळीस आल्याने स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने २०१२ मध्ये नवीन वर्गखोली बांधण्याची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे मागणी केली. त्यासाठी ठराव, पत्रव्यवहार व त्यांचा पाठपुरावा या सर्व बाबी करण्यात आल्या. परंतु, प्रशासनाने लक्ष दिले नाही.
दरम्यान, यातील एक वर्गखोली कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच त्यातून प्राणहानी होण्याची शक्यता बळावल्याने ती वर्गखोली शाळा व्यवस्थापनाने जमीनदोस्त केली. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने आधी ठराव पारित केला होता. तेव्हापासून आजवर भागेबोरी येथे शाळेची केवळ एकच वर्गखोली शिल्लक आहे. या खोलीत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे एकूण ६४ विद्यार्थी - विद्यार्थिनी एकत्र बसतात आणि शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना तीन शिक्षक शिकवितात. एकाच खोलीत एवढे विद्यार्थी कसे शिक्षण घेत असतील याची कल्पना न केलेली बरी!

व ऱ्हांड्यात बसण्याची वेळ
या शाळेत एकूण पाच वर्ग आहेत. यातील इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थी शाळेच्या व ऱ्हांड्यात बसून, शिक्षण घेतात तर, इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी - विद्यार्थिनी वर्गखोलीत बसून ज्ञानार्जन करतात. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना मात्र शाळेपासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या समाजमंदिरात शिक्षण घेण्यासाठी बसावे लागते. तिथे जागा अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसावे लागते. विशेष म्हणजे, मुख्याध्यापकाचे कार्यालयदेखील त्याच वर्गखोलीत आहे.

‘डिजिटल स्कूल’चा देखावा
भिवापूर तालुक्यातील ८० टक्के शाळा ‘डिजिटल’ व उर्वरित २० टक्के शाळा ‘मिनी डिजिटल’ झाल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. यात भागेबोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचाही समावेश आहे. या शाळेत संगणक, मोबाईल, प्रोजेक्टर यासह अन्य साहित्य देण्यात आले. वर्गखोलीअभावी सदर साहित्य ठेवायचे कुठे, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे वर्गखोलीतील एका टेबलवर कॉम्प्युटर व मोबाईल ठेवण्यात आले असून, इतर साहित्य कुलूपबंद आहे.

अतिरिक्त वर्गखोली आली कुठून?
वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी शाळा व्यवस्थापन समितीने सतत पाठपुरावा केला. परंतु, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या पत्रांकडे काडीचेही लक्ष दिले नाही. उलट, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने भागेबोरी येथे तीन वर्गखोल्या होत्या. त्यातील दोन खोल्या मोडकळीस आल्या असून, एक खोली शाबूत असल्याचा अहवाल तयार केला. आता ही अतिरिक्त वर्गखोली आली कुठून, असा प्रश्न भागेबोरीवासीयांनाच पडला आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधीही लक्ष देत नाही, असा आरोप पालकांनी केला आहे.

Web Title: The school fills two classes in a room, two verandahs and one community hall; The reality of Bhivapur in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा