व्हॅनचालकाकडून शाळकरी मुलीचा छळ
By admin | Published: November 5, 2016 03:07 AM2016-11-05T03:07:44+5:302016-11-05T03:07:44+5:30
स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनीचा (वय १४) गेल्या दोन महिन्यांपासून छळ चालवला.
अजनीतील संतापजनक प्रकार उघड : गुन्हा दाखल, आरोपी गजाआड
नागपूर : स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनीचा (वय १४) गेल्या दोन महिन्यांपासून छळ चालवला. आरोपीने कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडित मुलगी मुकाट्याने शारीरिक आणि मानसिक छळ सहन करीत होती. हा गैरप्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आल्यानंतर अजनीत संतापाचे वातावरण निर्माण झाले. नंतर अजनी पोलिसांनी आरोपी व्हॅनचालक मनोज माणिक खांडेकर (वय ४५) याला अटक केली.
आरोपी मनोज विवाहित असून त्याला पीडित मुलीच्या वयाची मुले आहेत. पीडित मुलगी त्याच्या घराशेजारी राहते. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. आरोपीच्या व्हॅनमधूनच ती शाळेत जायची. दोन ते अडीच महिन्यांपूर्वी ती एकदा व्हॅनमध्ये एकटी असल्याचे पाहून त्याने तिचा हात पकडला.
नंतर तो संधी मिळताच तिला स्पर्श करू लागला. मुलीने विरोध केला असता त्याने ‘आपले अनेक खतरनाक गुन्हेगारांशी संबंध आहे, या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या आई-वडिलांना ठार मारेन ’, अशी धमकी दिली. यामुळे पीडित मुलगी हादरली. तर, आरोपी निर्ढावला. त्याने तिला संपर्कात ठेवण्यासाठी तीन-चार वेळा तिच्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने बॅलेन्स रिचार्ज करून दिला होता. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून अजनीचे ठाणेदार सांदिपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एस. यू. मंडवाले यांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी व्हॅनचालक मनोज खांडेकर याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
ती अभ्यासातही मागे पडली
तो उठसूठ कधीही तिच्याशी संपर्क करू लागला. वाईट मेसेज निर्लज्जपणे पाठवू लागला. त्यामुळे मुलगी भेदरली. त्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर झाला. चांगली हुशार मुलगी सराव परीक्षेत मागे पडल्याचे अन् ती प्रत्येकवेळी अस्वस्थ राहत असल्याचे आईच्या लक्षात आले. त्यामुळे आईने तिचा मोबाईल चेक केला असता त्यात आरोपी व्हॅनचालक मनोजचे निर्लज्ज मेसेज आईला दिसले. संतापलेल्या आईने गुरुवारी मुलीला खोदून खोदून विचारले तेव्हा हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. आईने मुलीच्या वडिलांना हा गैरप्रकार सांगितला.