गणवेशासाठी शाळकरी मुलीची आत्महत्या
By admin | Published: July 14, 2016 02:50 AM2016-07-14T02:50:30+5:302016-07-14T02:50:30+5:30
वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याजवळ गणवेश नसल्याची खंत सातत्याने असल्याने...
परिस्थितीने घेतला बळी : शिक्षणापेक्षा गणवेश महत्त्वाचा का?
नागपूर : वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याजवळ गणवेश नसल्याची खंत सातत्याने असल्याने नागपुरातील रविनगर येथील सी.पी.अॅण्ड बेरार शाळेच्या आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. रितू गजानन ढाकुलकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. रितूच्या आत्महत्येने समाजमन मात्र सुन्न झाले आहे.
रितूच्या वडिलांचा रविनगर चौकात पानठेला आहे. आई धुणीभांडी करते. दिवसभर घरात मोठी बहीण कांचन व लहान भाऊ चेतन असतो. शाळेचा आठव्या वर्गापासून गणवेश बदलतो.
त्यामुळे नवीन गणवेश घेणे गरजेचे होते. शाळेतून तिला गणवेशासाठी विचारणा झाली. चार दिवसापूर्वी रितूने वडिलांकडे मागणी केली. परिस्थिती नसल्याने वडीलही तिला दोन-चार दिवसात गणवेश घेऊन देणार होते. वडिलांनी शिक्षकांची भेट घेऊन त्यांना कारण सांगितले होते. शिक्षकांनीच तिला आम्हीच गणवेश देऊ, असे सांगितले होते. आईला तिने शाळेतूनच गणवेश मिळणार आहे, असेही सांगितले होते.
-तर रितूने आत्महत्याच केली नसती
रितू हट्टी होती. टीव्ही बघण्यावरून बहिणीशी तू-तू-मै-मै करायची. शाळेतून आल्यावर आईच्या मागेच रहायची. तिची आई धुणीभांडी करण्यासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजता घराबाहेर पडली. दररोज दुपारी आई घरी यायची. परंतु मंगळवारी काम जास्त असल्याने ती घरी परतलीच नाही. मी दुपारी घरी आले असते, तर रितूने आत्महत्या केली नसती, पोरगी हातची गेली, आता ती कधीच बोलणार नाही, असा टाहो तिच्या आईने फोडला.