शाळा कधी होणार स्मार्ट ?
By admin | Published: September 4, 2015 02:48 AM2015-09-04T02:48:27+5:302015-09-04T02:48:27+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील महापालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय आहे.
बसायला बेंच अन् शिकवायला शिक्षक नाही : शौचालयाचाही अभाव
नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील महापालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय आहे. कुठे विद्यार्थ्यांना बसायला बेंच नाही तर कुठे शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याचे धक्कादायक वास्तव प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता निदर्शनास आले.
संजयनगर येथील मनपाच्या हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट दिली असता धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. दहावीच्या परीक्षेत या शाळेतील शाहू हा विद्यार्थी मनपा शाळातून पहिला आला होता. परंतु येथील स्थिती थक्क करणारी आहे. शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊन दोन महिने झाले. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप विज्ञान, गणित व इतिहास विषय शिकविले जात नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क-बेंच नसल्याने त्यांना चटई वा जमिनीवर बसावे लागते. शिक्षक आपल्या मर्जीनुसार शाळेत येतात व घरी जातात.
त्यामुळे वर्गात शिकवले जात नाही. यासंदर्भात तक्रार केली तर शाळाप्रमुखांकडून विद्यार्थ्यांनाच दमदाटी केली जाते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
शिक्षकांची मनमानी व सुविधांचा अभाव याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नाही. तसेच चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी विद्यार्थ्यांना दमदाटी करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. शौचालयाची दुरवस्था असून येथे याचा वापर करता येत नाही. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग होत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी रामभरोसे असल्याचे चित्र आहे.
या शाळेतील विद्यार्थी शाहू याने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून मनपा शाळेत पहिला आला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाचे या शाळेकडे लक्ष जाईल व सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. येथील मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, मनपाच्या शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संजयनगर शाळेला भेट दिली असता येथे अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. शिक्षकांची मनमानी, वर्गखोल्यांची दुर्दशा, अस्वच्छता, वर्गात शिकविले जात नसल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या. याबाबतचा अहवाल समितीने महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सोपविला आहे. अहवालामुळे आयुक्त संबंधित शिक्षकांवर कारवाई करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
विभागप्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
संजयनगर शाळेतील अनियमिततेसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशावरून पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. विभागप्रमुख अशोक टालाटुले या समितीचे प्रमुख आहेत. परंतु शिक्षण समितीच्या काही सदस्यांनी यापूर्वीच टालाटुले यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली होती. टालाटुले यांच्यावर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. असे असतानाही चौकशीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणे चुकीचे असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.
निलंबन कारवाई होण्याची शक्यता
संजयनगर शाळेच्या मुख्याध्यापक ांच्या विरोधातील तक्रारी व अनियमितता यासंदर्भात शिक्षक संघटनांनी अनेक तक्र ारी केल्या आहेत. शिक्षण समितीनेही पाहणी केली तसेच चौकशी समितीने आयुक्तांना अहवाल दिला. अहवालामुळे काही शिक्षकांवर निलंबन कारवाई होणार असल्याची शिक्षण विभागात चर्चा आहे.