शाळकरी मुलाचे अपहरण

By Admin | Published: January 8, 2016 03:34 AM2016-01-08T03:34:51+5:302016-01-08T03:34:51+5:30

१४ वर्षाच्या शाळकरी मुलाचे मनीषनगरातून अपहरण झाल्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे.

School kidnapping | शाळकरी मुलाचे अपहरण

शाळकरी मुलाचे अपहरण

googlenewsNext

नागपूर : १४ वर्षाच्या शाळकरी मुलाचे मनीषनगरातून अपहरण झाल्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे. चैतन्य सुभाष आष्टनकर असे अपहृत मुलाचे नाव आहे. तो मनीषनगरातील पॉप्युलर सोसायटीतील रहिवासी आहे.
चैतन्यच्या आई सुनंदा (वय ४८) आणि वडील सुभाष (वय ५३) दोघेही शिक्षक आहेत. त्याला गायत्री (वय २१) आणि हर्षदा (वय १९) या दोन बहिणी आहेत.
जामठा फाटा जवळच्या माऊंटफोर्ट स्कूलमध्ये आठवीत शिकणारा चैतन्य रोज सकाळी ६.४५ ला स्कूलबसने शाळेत जातो आणि २.३० ते ३ च्या दरम्यान बसनेच घरी परततो. नेहमीप्रमाणे आज दुपारी २.४० ला तो बेलतरोडीच्या बँक आॅफ बिकानेर शाखेजवळ बसमधून मित्रासह उतरला. पाच मिनिटांच्या अंतरावर त्याचे निवासस्थान असल्याने तो तेथून घराजवळ आला. अचानक सिल्वर कलरची मारूती इको कार आली. त्यातील एक पांढरा शर्ट घातलेला आरोपी उतरला आणि नवनीत डेकोरेशनच्या फलकाजवळून त्याने चैतन्यला कारमध्ये कोंबले. लगेच ही कार सुसाट वेगाने पुढे निघाली. अवघ्या दोन मिनिटातच अपहरणकर्त्यांनी डाव साधला. चैतन्यसोबत घराकडे निघालेला अन २०० फूट अंतरावर असलेल्या मित्राने हा प्रकार बघितला.
चैतन्यचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच हादरलेला तो मुलगा धावतच स्वत:च्या घरी गेला. त्याने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्याच्या आईने लगेच गायत्रीला (चैतन्यची बहीण) तर गायत्रीने सुनंदा आष्टनकर यांना फोन करून हा प्रकार सांगितला. सुनंदा यांनी त्यांचे पती सुभाष यांना ही माहिती कळविली. त्यानंतर सुभाष आष्टनकर आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींसह सोनेगाव पोलीस ठाण्यात पोहचले. शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार मिळताच पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली. (प्रतिनिधी)

अपहरणकर्ते आणि कारण गुलदस्त्यात
माहिती कळताच परिमंडळ - १ चे उपायुक्त शैलेष बलकवडे सोनेगाव ठाण्यात पोहचले. त्यांनी चैतन्यच्या परिवारातील सदस्यांकडून बारीकसारीक माहिती मिळवत या अपहरणामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आष्टनकर परिवार मूळचा गुमगाव (हिंगणा) परिसरातील रहिवासी असून, पती-पत्नी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत शाळेत (घराबाहेर) असतात. चैतन्यसुद्धा सालस स्वभावाचा असून, आपले कुणाशी वैर नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. कुणावरही शंका नसल्याचे त्यांनी म्हटले. अपहरणाची घटना घडून ५ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अपहरणकर्ते किंवा त्यांच्या साथीदारांपैकी कुणाचाच आष्टनकर परिवारात फोन आला नाही. यामुळे या प्रकरणातील अपहरणकर्त्यांसोबतच अपहरणाचे कारणही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, खंडणीसाठीच हे अपहरण करण्यात आले असावे, असा अंदाज आहे. त्यांनी चैतन्यची आधी माहिती काढूनच त्याचे अपहरण केले असावे, असा कयास पोलिसांनी लावला आहे.

दहा पथकांकडून तपास

गेल्या पाच वर्षांत शहरात घडलेल्या कुश कटारिया, युग चांडक आणि विक्की बोरकर अपहरण आणि हत्याकांडाची तसेच गेल्या महिन्यात जरीपटक्यातील बहीण भावाचे अपहरण आणि हत्या प्रकरणाने उपराजधानीकरांच्या मनात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे चैतन्यचे अपहरण झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि आप्तस्वकियच नव्हे तर नागपूरकरांसह पोलीसही हादरले आहेत. त्याचा तातडीने शोध घेण्यासाठी गुन्हेशाखेसह अन्य पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कामी लावण्यात आले आहे. पोलिसांची दहा पथके चैतन्य आणि त्याचे अपहरण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: School kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.