शाळेत नववीच्या विद्यार्थ्यास अमानुष मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:27 PM2019-02-14T23:27:06+5:302019-02-14T23:34:56+5:30

विद्यार्थी आजारी असल्याने नियमानुसार दुसरा विद्यार्थी त्याच्या सोबतीला रूममध्ये थांबला होता. मात्र, तो दुसऱ्या विद्यार्थ्याच्या रूममध्ये दिसताच शिक्षकाने ‘त्या’ विद्यार्थ्याला कुठलीही चौकशी न करता अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डाव्या हातावर लाल व्रण उमटले आहेत. हा प्रकार नवेगाव (खैरी), ता. पारशिवनी येथील जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.

In the school ninth class student brutally beaten | शाळेत नववीच्या विद्यार्थ्यास अमानुष मारहाण

शाळेत नववीच्या विद्यार्थ्यास अमानुष मारहाण

Next
ठळक मुद्देडाव्या हातावर उमटले व्रणनागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी भागातील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षकाचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थी आजारी असल्याने नियमानुसार दुसरा विद्यार्थी त्याच्या सोबतीला रूममध्ये थांबला होता. मात्र, तो दुसऱ्या विद्यार्थ्याच्या रूममध्ये दिसताच शिक्षकाने ‘त्या’ विद्यार्थ्याला कुठलीही चौकशी न करता अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डाव्या हातावर लाल व्रण उमटले आहेत. हा प्रकार नवेगाव (खैरी), ता. पारशिवनी येथील जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.
अथर्व अनिल भदाडे, रा. नागपूर असे मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे तर राजन गजभिये असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. अथर्व हा जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ९ (ब) चा विद्यार्थी असून, तो जवाहर नवोदय विद्यालयाच्या ‘उदयगिरी हाऊस’मधील खोलीत राहातो. त्याचा वर्गमित्र आर्यन नवघरे, रा. वाडी हा ‘नीलगिरी हाऊस’मधील खोलीत राहात असून, तो आजारी असल्याने अथर्व नियमानुसार त्याच्या खोलीत थांबला होता. तो आर्यनला उपचारासाठी ‘डिस्पेन्सरी’त घेऊन जात असताना राजन गजभिये यांची दोघांवर नजर पडली.
गजभिये यांनी दोघांना थांबवून ‘तू निलगिरी हाऊसमध्ये का थांबला’ अशी अथर्वला विचारणा केली. त्याने उत्तर देण्याच्या आधीच गजभिये यांनी त्याच्या डाव्या हातावर काठीने मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर गजभिये यांनी अथर्वला अश्लील शिवीगाळ करून शाळेतून काढून टाकण्याचा दम भरला. या प्रकारामुळे अथर्व चांगलाच घाबरला होता.
काही वेळाने त्याने हा प्रकार वडिलांना फोनवरून सांगितला. या संदर्भात अथर्वचे वडील अनिल भदाडे यांनी सांगितले की, अथर्वला केलेली अमानुष मारहाण ही निंदनीय आहे. शिक्षकांनी अशी मारहाण अन्य विद्यार्थ्यांसोबत करू नये. या प्रकरणाची शाळा व्यवस्थापनाने चौकशी करून दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करावी. या संदर्भात आपण पोलिसात तक्रार करणार आहे, असेही अनिल भदाडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये दहशत
याच शाळेतील शिक्षकाने चार दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यास मारहाण केली होती. शाळेतील घडामोडी पालकांना सांगत असल्याने त्याला मारहाण करण्यात आली होती. शाळा व परिसरातील कोणत्याही घडामोडींची माहिती शाळा परिसराबाहेर जाता कामा नये, अशी ताकीदही त्यावेळी शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिली होती. विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार वाढत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.
वादग्रस्त वर्तन
अर्थवला मारहाण करणारे शिक्षक राजन गजभिये पूर्वी अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयात होते. ते बदली होऊन नवेगाव (खैरी) येथे आले. त्यांचे अकोला येथेही वादग्रस्त वर्तन असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. विद्यार्थिनींना छळण्याचे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्याने तसेच तेथील पालक आक्रमक झाल्याने त्यांची अकोला येथून बदली केल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिक्षक व पालकांचा वाद
जवाहर नवोदय विद्यालयात पालकांची नियिमत बैठक बोलावली जाते. या बैठकांमध्ये पालक शाळेतील विविध गैरसोयी मांडत असल्याने तसेच शिक्षक पालकांचे काहीही ऐकून घ्यायला तयार राहात नसल्याने शिक्षक व पालकांमध्ये प्रत्येक बैठकीत शाब्दिक चकमकी उडतात. दुसरीकडे, शिक्षक विद्यार्थ्यांना त्रास देतात. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा खालावल्याने विद्यार्थी त्यांच्या पालकांकडे तक्रारी करतात. शिक्षक मात्र पालकांचे काहीही ऐकून घेत नाही.

Web Title: In the school ninth class student brutally beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.