नागपूर जिल्ह्यातील चिचोलीत विद्यार्थीच उघडतात शाळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:58 AM2018-08-02T11:58:34+5:302018-08-02T11:59:01+5:30
शिक्षक वेळेवर शाळेत येत नाही आणि शाळा वेळेत उघडावी म्हणून मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून शाळा उघडण्याचा प्रकार चिचोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये निदर्शनास आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षक वेळेवर शाळेत येत नाही आणि शाळा वेळेत उघडावी म्हणून मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून शाळा उघडण्याचा प्रकार चिचोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये निदर्शनास आला. बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पंचायत समिती सदस्य भीमराव आवळे हे शाळेत पोहोचले. यावेळी पहिली ते चौथीचे विद्यार्थी शाळेच्या पटांगणात शिक्षकांची वाट पाहत होते. विद्यार्थी हजर, शिक्षक गैरहजर अन् शाळा बंद, हे दृश्य पाहून आवळे यांनी शिक्षणाधिकारी भाकरे यांना फोनद्वारे हकीकत सांगितली. तेव्हा काही मिनिटातच ते शाळेत पोहोचले आणि शाळेतील शिक्षक शाळेत वेळेवर येत नसून विद्यार्थीच शाळा उघडत असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला.
शिक्षणाधिकारी भाकरे शाळेत पोहोचल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोंगसे, शिक्षिका विद्या कचरे, निर्मला आसोले यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता, इयत्ता चौथीची विद्यार्थिनी शिनू भास्कर भोयर हिच्याकडे शाळेची चावी असून तीच शाळा उघडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
एरवी सकाळी १०.३० वाजता शाळा सुरू होते. परंतु निर्मला आसोले या शिक्षिका शाळेत ११.३० वाजता पोहोचल्या. तोपर्यंत शिक्षणाधिकारी भाकरे व पंचायत समिती सदस्य भीमराव आवळे यांच्यासमोर विद्यार्थ्यांनीच शाळा उघडली. शाळा उघडून इयत्ता चौथीच्या वर्गात प्रवेश केला असता टेबलवर छडी दिसून आली. छडी पाहून शिक्षणाधिकारी भाकरे यांनी छडी कशासाठी असल्याचे विचारले असता शिक्षिका विद्यार्थ्यांना छडीने मारहाण करीत असल्याचाही प्रकार विद्यार्थ्यांनी सांगितला. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा मुख्याध्यापिकेशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी फोन उचलला. त्यांच्या कुटुंबात कुणाचा तरी मृत्यू झाल्याने त्या गैरहजर असल्याचे सांगितले तर विद्या कचरे यांनी आजारी असल्याचे कारण सांगितले.
शिक्षक शाळेत उशिरा येत असल्याची तक्रार पं.स. सदस्य भीमराव आवळे यांना आधीच मिळाल्याने हा प्रकार त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसमोर उघडकीस आणला. शाळा उशिरा उघडली जात असल्याची लेखी तक्रार तीन दिवसांपासून सतत मिळत असल्याचे आवळे यांनी सांगितले.
वॉर्ड क्र. ४ मधील शाळेत केली पाहणी
दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी चिचोली वॉर्ड क्र. ४ मधील रणछोडदास जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन तेथील पाहणी केली. यावेळी शाळेतील शिक्षक हजर होते. मस्टर बुक तपासले असता शिक्षक संजय गोलाईत यांनी दोन दिवसाच्या सुटीचा अर्ज दिल्याचे आढळून आले. मात्र ते पाच दिवस अधिक सूचना न देताच गैरहजर दिसून आल्याने त्यांचेही महिनाभराचे वेतन थांबविण्यात आले. शिवाय सदर शिक्षक व्यसन करून शाळेत शिकवीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविणार असल्याचे शिक्षणाधिकारी भाकरे यांनी स्पष्ट केले.
बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई व्हावी
सर्वत्र जि. प. शाळांची दैनावस्था झाली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना जि.प. शाळेव्यतिरिक्त पर्याय नाही. शासन विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, मध्यान्हाचा पुरवठा करतात. परंतु काही शिक्षकांच्या अशा वागणुकीमुळेच पालक वर्ग काबाडकष्ट करून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकविण्याचा अधिक प्रयत्न करतात. त्यामुळेच दिवसेंदिवस जि. प. शाळेची पटसंख्या कमी झाल्याने शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शाळा बंद पडल्याने शिक्षकांचे दुसरीकडे स्थलांतर होते, त्यामुळे अशा बेजबाबदार शिक्षकांना काहीही फरक पडत नाही. अशा शिक्षकांमुळेच जि. प. शाळा बदनाम होत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी पालकांची आहे.
गैरहजर शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे निर्देश
शिक्षणाधिकारी भाकरे यांनी पंचनामा केला, तोवर चिचोलीचे सरपंच पुरुषोत्तम चांदेकर शाळेत पोहोचले. केंद्रप्रमुखही हजर नव्हते. शाळेत तपासणी केली असता गैरहजर शिक्षकांनी सुटीबाबत अर्जही दिले नव्हते. यामुळे सदर तिन्ही शिक्षिकांची गैरहजेरी लावून एक महिन्याचे वेतन थांबविण्याचे निर्देश दिले. हीच परिस्थिती या शाळेत असलेल्या दोन अंगणवाडीमध्ये सुरू असल्याचे दिसून आले. शिक्षक गैरहजर असल्याने जवळच्या अन्य जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बोलावून विद्यार्थ्यांची सामूहिक प्रार्थना झाली आणि वर्ग सुरू करण्यात आले.