शाळांचा निकाल यंदा १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:22+5:302021-06-02T04:07:22+5:30

नागपूर : दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आणि अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे यंदा ...

School results 100 percent this year | शाळांचा निकाल यंदा १०० टक्के

शाळांचा निकाल यंदा १०० टक्के

Next

नागपूर : दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आणि अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे यंदा सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार असल्याने शाळांचे निकाल १०० टक्के लागणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थी आनंदी आहेत. पण हुशार विद्यार्थ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. पालकांचीही द्विधा मन:स्थिती आहे.

नागपूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ८५ हजार विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करून निकाल आणि गुणवत्तेबाबत धोरण शासनाने शुक्रवारी जाहीर केले. निकालाबाबत दहावीच्या परीक्षेसाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणानुसार देण्यात येणार आहे. तर अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर केले असून, ती ऐच्छिक ठेवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थी खूश आहेत; मात्र ज्या विद्यार्थ्यांना नववीत कमी गुण मिळाले होते, त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

- काय म्हणतात विद्यार्थी

दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल नववी व दहावीच्या अंतर्गत परीक्षांवर आधारित असेल हा निर्णय आम्हाला मान्य नाही. कारण नववीच्या घटक चाचण्या होऊ शकल्याने त्यांना त्यावेळी सरासरीच्या आधारावर गुणदान करून अंतिम निकाल देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी यंदा दहावीचा अभ्यास केलाच नाही, त्यांचे चांगलेच फावेल. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता मोजली जाताना हुशार विद्यार्थ्यांचे निश्चितच नुकसान होईल.

आदित्य मुरकुटे, विद्यार्थी

- नववीची बोर्ड परीक्षा नसल्यामुळे आम्ही गंभीरतेने अभ्यास केला नाही. पण आता नववीच्या गुणांचे मूल्यांकन होणार असल्याने त्याचा परिणाम निकालावर होणार आहे.

हर्षल सोनसरे, विद्यार्थी

- काय म्हणतात पालक

शासनाच्या निर्णयाचे मी १०० टक्के समर्थन करीत नाही. विद्यार्थी घरी असला तरी त्याने वर्षभर मेहनत केली. त्याने केलेले प्रयत्न सिद्ध करण्याकरिता लेखी परीक्षेची आतुरतेने वाट बघत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला निर्णय योग्य असला तरी हुशार विद्यार्थी नाराज झाले आहेत.

ममता मानमुळे, पालक

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. पण हुशार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणार नाही. पण अकरावीच्या प्रवेशाची सीईटी तरी गंभीरतेने घ्यावी ती ऐच्छिक न ठेवता सर्वांसाठी ठेवायला हवी होती. सीईटीचा आधार घेऊन दहावीचा निकाल दिल्यास किमान मूल्यांकन योग्य होईल.

राकेश सेलूकर, पालक

- काय म्हणतात शिक्षण तज्ज्ञ

- नववीच्या निकालावर ५० पैकी गुणदान योग्य वाटत नाही. नववीचा निकाल वस्तुनिष्ठ आणि परिपूर्ण नाही. गेल्यावर्षी द्वितीय सत्राच्या परीक्षा झाल्या नाहीत. प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा आयोजित करताना विद्यार्थी प्रतिसाद कसा असेल याबाबत शंका आहे. शासनाने जूनअखेर निकाल जाहीर करण्याचे म्हटले आहे, एवढ्या कमी वेळात ते शक्य आहे का? प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने, न्यायालयाने परीक्षा घेण्याचे आदेश दिले तर?

पुरुषोत्तम पंचभाई, शिक्षणतज्ज्ञ

- ५० टक्के नववीचे, ३० टक्के दहावी आणि २० टक्के तोंडी, प्रोजेक्टवर मूल्यांकन करायचे आहे.याप्रकारे मूल्यांकन करणे अवघड आहे. अर्धवट धोरण ठरविले आहे. मुळातच मूल्यांकन करण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्यायला हवा. नवीन शिक्षण धोरणात बारावीला महत्त्व दिले आहे. मूल्यांकनाचे गणित सोडविणे शिक्षकांसाठी अवघड आहे.

रवींद्र फडणवीस, शिक्षणतज्ज्ञ

- कोरोनाच्या परिस्थितीत शासनाने मूल्यमापनाचे केलेले नियोजन उपयुक्त आहे. राष्ट्रीय महामारीमध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही. विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून जी पद्धत मूल्यांकनाची सुचविली ती योग्य आहे. यात कुठलाही किस न पाडता मूल्यांकन करावे.

योगेश बन, शिक्षणतज्ज्ञ

Web Title: School results 100 percent this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.