शाळांचे सॅनिटायझेशन शिक्षकांची कोरोना टेस्ट
By अबोली कुलकर्णी | Published: November 22, 2020 09:28 AM2020-11-22T09:28:57+5:302020-11-22T09:28:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून सुरू होत आहेत. यात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीपर्यंतची माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मनपा शाळांत सॅनिटायझेशन करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी केली जात आहे.
शनिवारी पेन्शननगर, उर्दू हायस्कूल, बस्तरवारी माध्यमिक शाळा, लालबहादूर शास्त्री शाळा, सुरेंद्र गड येथील शाळा, हिंदी माध्यमिक शाळा, मराठी व उर्दू माध्यमिक शाळा यासह अन्य शाळांत सॅनिटायझेशन करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. शहरात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीपर्यंत ५९३ शाळा आहेत. या शाळांच्या ६२५२ शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर चाचणी (कोरोना चाचणी) मनपाच्या ५० कोविड-१९ चाचणी केंद्रात आणि सहा वॉक इन सेंटरमध्ये नि:शुल्क केली जात आहे. शनिवारी केंद्रावर चाचणीसाठी शिक्षकांनी गर्दी केली होती.
आवश्य सुविधांची व्यवस्था
सर्व शाळांना थर्मामीटर, थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक साबण इत्यादींची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षक व कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रीनिंग
सर्व शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रोज थर्मल स्क्रीनिंग केली जाईल. इतरांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी मास्क, पाण्याची बॉटल, शालेय साहित्य याची अदलाबदल करू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
....
पालकांनी विद्यार्थ्यांना स्वत: शाळेत आणावे
पालकांनी विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावयाचे आहे. स्कूल बसची व्यवस्था राहणार नाही.
....
पालकांचे संपतीपत्र लागणार
सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र लागणार आहे. मनपाच्या माध्यमाने शाळांना सर्व वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.