नागपुरात शाळेचे विद्यार्थी डेंग्यूच्या सावटाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 09:36 PM2019-09-19T21:36:08+5:302019-09-19T21:38:17+5:30
नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीपाय रोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या शाळांच्या तपासणीत २९ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीपाय रोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या शाळांच्या तपासणीत २९ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, डेंग्यूचा डास दिवसा चावत असल्याने आणि याचवेळी विद्यार्थी शाळेत राहात असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने शाळांना स्वच्छता पाळण्याचे पत्र दिले आहे. अशा दूषित शाळा व घरांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव मनपाच्या उपद्रव शोध पथकालाही देण्यात आला आहे.
नागपूर शहरात पहिल्यांदाच २०१२ मध्ये डेंग्यूचे २३७ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४० वर पोहचली. यात दोन मृत्यू होते. २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१, २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५, २०१७ मध्ये २०० तर गेल्या वर्षी, २०१८ मध्ये ५४३ रुग्ण आढळून आले. या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत ६९ रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे पंधरा वर्षाखालील मुले-मुली आहे. याला गंभीरतेने घेत हिवताप व हत्तीपाय रोग विभागाने शाळा सुरू झाल्यापासून शाळांची तपासणी मोहीम हाती घेतली. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात २९ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. शाळांमध्ये डेंग्यूची उत्पत्ती ही कूलर्स, पाण्याच्या टाक्या, स्वच्छतागृह, कुंड्या, ड्रममधून होत असल्याचे मनपा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शाळेतील प्राचार्य, शिक्षक किंवा जबाबदार अधिकाऱ्यांना अळ्या दाखविल्या. त्यांच्यासमक्ष पाण्याची विल्हेवाट लावून कीटकनाशक फवारणी केली. सोबतच स्वच्छता पाळण्याचे पत्रही दिले. या शिवाय, डेंग्यू अळ्या शोध मोहीम घराघरांतही सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात ९४ घरे दूषित आढळून आलीत.
दंडात्मक कारवाईसाठी प्रस्ताव
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. डेंग्यूला कारणीभूत असलेला ‘एडीस’ डास हा कूलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, डबके व पावसाचे किंवा स्वच्छ पाणी जिथे जमा राहिल अशा ठिकाणी हा लवकर फैलतो. यामुळे पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. परंतु काही शाळा व घरमालक याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे विद्यार्थी व नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागते. यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडे पाठविण्यात आला आहे.
जयश्री थोटे
अधिकारी, हिवताप व हत्तीपाय रोग विभाग, मनपा