रोडरोमियोंच्या शिकार ठरताहेत शालेय विद्यार्थिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:40 PM2019-09-25T23:40:45+5:302019-09-25T23:42:41+5:30

शहरातील रस्त्यांवर रोडरोमियोंचा वावर वाढला आहे. विद्यार्थिनींची छेड काढणे, त्यांचा पाठलाग करणे यामुळे शालेय विद्यार्थिनी त्रस्त आहे. मंगळवारी शहरात वेगवेगळ्या भागात आठ तासात विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या चार घटना घडल्या.

School students are victimized by Road Romeo | रोडरोमियोंच्या शिकार ठरताहेत शालेय विद्यार्थिनी

रोडरोमियोंच्या शिकार ठरताहेत शालेय विद्यार्थिनी

Next
ठळक मुद्देआठ तासात चार घटना आल्या उघडकीस : पालकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील रस्त्यांवर रोडरोमियोंचा वावर वाढला आहे. विद्यार्थिनींची छेड काढणे, त्यांचा पाठलाग करणे यामुळे शालेय विद्यार्थिनी त्रस्त आहे. मंगळवारी शहरात वेगवेगळ्या भागात आठ तासात विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या चार घटना घडल्या. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घटनेत छेड काढणाऱ्या एका युवकाला नागरिकांनी पकडून त्याची धुलाई केली.
पहिली घटना रात्री ११ वाजता धंतोली गार्डन जवळ घडली. १७ वर्षीय विद्यार्थिनी आपल्या घरासमोर दुचाकी चालविणे शिकत होती. तिला एकटे बघून कुंजीलालपेठ येथील २४ वर्षीय आदित्य राजू रंगारी तिच्याजवळ आला. त्याने तिला मोबाईल नंबर मागितला. पण तिने दुर्लक्ष करून ती घरात परतली. अपार्टमेंटमध्ये दुचाकी पार्क करीत असताना, आदित्य तिच्या मागे पार्किंगमध्ये आला. त्याने तिचा हात पकडला. त्यामुळे विद्यार्थिनी ओरडली, शेजारी तात्काळ आल्याचे बघून आदित्य पळून जाऊ लागला. परंतु नागरिकांनी त्याला पकडून चांगली बत्ती दिली. धंतोली पोलिसांनी आदित्यला ताब्यात घेतले, छेड काढली नाही, असे त्याचे म्हणणे आहे. तो पेंटिंगचे काम करतो. दोन महिन्यापुर्वी तो ग्वाल्हेर येथून आला होता. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला.
दुसरी घटना पाचपावली ठाण्यांतर्गत घडली. १३ वर्षीय विद्यार्थिनी गरबा खेळण्यासाठी गेली होती. वस्तीत राहणारा १७ वर्षीय हर्षल ऊर्फ सोनू राजू मसराम याने तिच्याशी आपत्तीजनक वर्तन केले. विद्यार्थिनीने घरच्यांना माहिती दिली. पाचपावली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी हर्षलला अटक करून त्याच्याविरुद्ध छेडखानी व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. तिसरी घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. १७ वर्षीय विद्यार्थिनी दुपारी ३.३० वाजता ट्युशनवरून घरी जात होती. वस्तीत राहणारा २८ वर्षीय जितेंद्र भगवान निस्ताने याने तिला थांबविले. त्याने विद्यार्थिनीचा हात पकडून आपत्तीजनक वर्तन करून तो फरार झाला. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जितेंद्रला अटक करून पोक्सो अन्वये कारवाई केली. चौथी घटना वाडी येथे घडली. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी किराणा दुकानातून सामान घेऊन घरी जात होती. वस्तीत राहणारा तिच्याच वयाच्या मुलाने तिची छेड काढली. वाडी पोलिसांनी छेडखानी व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

विवाहित महिलेचीही काढली छेड
मुलींना शाळेत सोडून देत असताना, विवाहित महिलेचीही छेड काढण्यात आली. ही घटना यशोधरानगर परिसरात घडली. २७ वर्षीय महिला आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात होती. दुचाकी चालक तिचा पाठलाग करीत होता. तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होता. तिने आपल्या नवऱ्याला सांगितले. मंगळवारी यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईचे निर्देश
पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या घटनांना गांभीर्याने घेण्याचे निर्देश दिले आहे. काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिशानिर्देश दिले आहे. त्यांनी अल्पवयीन मुलींचे शोषण होत असल्यास तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळे चारही घटनांना गांभीर्याने घेऊन पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली.

Web Title: School students are victimized by Road Romeo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.