मतदान करण्यासाठी शालेय विद्यार्थी देणार आई-बाबांना ‘संकल्प पत्र’

By आनंद डेकाटे | Published: March 24, 2024 05:50 PM2024-03-24T17:50:24+5:302024-03-24T17:50:44+5:30

'स्वीप' अंतर्गत विविध मतदार जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम

School students to give 'resolution letter' to parents for voting | मतदान करण्यासाठी शालेय विद्यार्थी देणार आई-बाबांना ‘संकल्प पत्र’

मतदान करण्यासाठी शालेय विद्यार्थी देणार आई-बाबांना ‘संकल्प पत्र’

नागपूर : मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण लक्षात घेता ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान व्हावे या उद्देशाने स्वीप अंतर्गतमिशन डिस्टींक्शन ७५ टक्के हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत शालेय मुले आता आई-बाबांना संकल्प पत्राद्वारे मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. हे 'संकल्प पत्र' मुले पालकांकडून भरून घेणार आहेत.

अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, जिल्ह्याचे मिशन डिस्टिंक्शन हे ध्येय पूर्णत्वास यावे, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत हा उपक्रम आम्ही राबविण्याचा निर्णय घेतला. मुलांच्या आवाहनाला आई-बाबा सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वाधिक संख्येने मतदान करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. सर्व शाळांमध्ये हा उपक्रम गावोगावी राबविला जाईल.

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाचे ध्येय ठेवले आहे.

- असा आहे संकल्प

“भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थिती वापर करील. मी मतदान करून आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहीत करीन. मी कोणत्याही भीतीपोटी, लालसोपोटी मतदान करणार नाही. तसेच धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडीन,” असे या संकल्प पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही संकल्पपत्रे संबंधित शाळेत विद्यार्थी जमा करणार आहेत.

Web Title: School students to give 'resolution letter' to parents for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.